विराट बोलून झाला..., आता सौरव गांगुलींच्या बोलण्याकडे सर्वांचं लक्ष
बीसीसीआयने विराट कोहलीकडून वनडेचं कर्णधारपद काढून घेतलं. यानंतर बीसीसीआय आणि विराट कोहली वादविवाद सुरू झाले.
मुंबई : बीसीसीआयने विराट कोहलीकडून वनडेचं कर्णधारपद काढून घेतलं. यानंतर बीसीसीआय आणि विराट कोहली वादविवाद सुरू झाले. कोहलीने एका पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांचं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी खंडन केलं. दरम्यान या संपूर्ण वादात आता माजी कोच रवी शास्त्री यांनी उडी घेतली आहे.
एका इंटरव्यूमध्ये बोलताना रवी शास्त्री म्हणाले, 'हे प्रकरण अधिक चांगल्या कम्युनिकेशद्वारे हाताळता आलं असतं. विराट कोहलीने त्याची बाजू सांगितली आहे. त्यामुळे आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याप्रकरणी खुलासा करून आपली बाजू मांडावी."
कोण खोटं बोलतंय हा प्रश्न नाहीये तर सत्य काय आहे हा आहे. आम्हाला खरं काय आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि मला वाटते की ते कम्युनिकेशन म्हणजेच संवादातून बाहेर येईल. दोन्ही बाजूंनी संवाद व्हायला हवा. कारण सध्या एकाच व्यक्तीने त्याची बाजू मांडली आहे, असंही रवी शास्त्री यांनी सांगितलंय.
सौरव गांगुली यांनी कोहलीला टी-20 चं कर्णधारपद न सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र गांगुली यांच्या या विधानाचं विराटने खंडन केलं होतं. त्यानंतरच एकदिवसीय टीम सिलेक्शनदरम्यान मुख्य सिलेक्टर चेतन शर्मा यांनी सांगितलं की, टी-20 वर्ल्डकपसाठी निवड बैठकीला उपस्थित असलेल्या प्रत्येकाने कोहलीला टी-20 कर्णधारपद सोडण्याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. त्यामुळे खरं काय हा प्रश्न समोर आहे.
यावर रवी शास्त्री यांनी विधान केलं असून आचा गांगुली यांनी उत्तर देण्याची वेळ असल्याचं म्हटलं आहे.