भारतीय महिला क्रिकेट संघाला (Indian Women Cricket Team) टी-20 वर्ल्डकपमध्ये  (T20 World Cup) अपेक्षित सुरुवात मिळालेली नाही. दुबईत झालेल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 58 धावांनी पराभव केला आहे. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावत 160 धावा केल्या होत्या. कर्णधार सोफीने नाबाद 57 धावा ठोकल्या. पण भारतीय संघ फक्त 102 धावांवर ऑल आऊट झाला. रोजमेरीने 4 विकेट्स घेतल्या. दरम्यान या सामन्यात एका क्षणी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरची पंचांसह जोरदार शाब्दिक चकमक झाली. अम्पायर्सनी न्यूझीलंडची फलंदाज अमेलिया कौरला नाबाद दिल्याने हा वाद झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर हा सगळा प्रकार घडला. न्यूझीलंडच्या केरने लाँग ऑफला चेंडू टोलावला आणि एक धाव काढली. हरमनप्रीत कौरने चेंडू अडवला होता. एकीकडे ओव्हर संपलेली असल्याने हरमनप्रीतला चेंडू डेड आहे असं वाटलं, तर दुसरीकडे केरने दुसऱ्या रनसाठी धाव घेतली. पण तो पूर्ण करण्याआधी ती रन आऊट झाली. पण तोपर्यंत अम्पायर्सनी टोपी दिप्ती शर्माकडे दिली होती आणि ओव्हर पूर्ण झाल्याचं जाहीर केलं होतं. 


भारतीय संघाने रन-आऊटसाठी अपील केली होती आणि दुसरीकडे केरनेही डग-आऊटच्या दिशने चालण्यास सुरुवात केली होती. पण अम्पायर्सनी ओव्हर संपली असल्याने ही धाव अयोग्य होती असं सांगत तिला नाबाद जाहीर केलं. 



या संपूर्ण प्रकाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि नियमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले. भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विननेही एक्स्वर या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र, नंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली. "दुसरी धाव घेण्याच्या आधीच ओव्हर जाहीर करण्यात आली होती. नेमकी ही चूक कोणाची?," अशी विचारणा अश्विनने केली होती. 



दरम्यान पराभवानंतर हरमनप्रीतने आपल्या संघाने आपली सर्वोत्तम कामगिरी केली नसल्याचं मान्य करत, पुढील सामन्यात सुधारणा होईल याकडे लक्ष देवू असं म्हटलं आहे. 


"आम्ही आज आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळले नाही. पुढे जाऊन आम्हाला कोणत्या क्षेत्रात सुधारणा करायची आहे याचा विचार केला पाहिजे. आता प्रत्येक खेळ महत्त्वाचा आहे आणि आम्हाला आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळायचे आहे. आम्ही काही संधी निर्माण केल्या होत्या. ते आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले, यात शंका नाही," असं हरमनप्रीतने सामन्यानंतर सांगितलं.


"या टप्प्यावर तुम्ही चुका करू शकत नाही. आम्ही अनेक वेळा 160-170 धावांचा पाठलाग केला आहे. पण त्या खेळपट्टीवर 10 ते15 अतिरिक्त धावा होत्या. एका टप्प्यावर त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली, ते पाहता 180 पर्यंत पोहोचतील असं वाटलं होतं. आम्हाला अपेक्षित असलेली ही सुरुवात नव्हती," असंही ती पुढे म्हणाली.