भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने वर्ल्डकपमधील पराभवानंतर खेळाडूंची नेमकी काय स्थिती होती याचा खुलासा केला आहे. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजयरथ रोखला आणि करोडो भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा केला. अंतिम सामन्यातील पराभवापूर्वी भारताने सर्व 10 सामने जिंकत भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. दरम्यान या पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली ररडत होते असं आर अश्विनने सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"हो आम्हाला फार वेदना झाल्या होत्या. रोहित आणि विराट रडत होते. ते पाहून आम्हालाही वाईट वाटत होतं. हा एक अनुभवी संघ होता. प्रत्येकाला आपण काय करायचं आहे हे माहिती होतं. तसंच ते प्रोफेशनलही होते. प्रत्येकाला त्यांचं रुटीन, वॉर्म अप याबद्दल माहिती होतं. मला वाटतं दोन नैसर्गिक नेतृत्वांनी (रोहित-विराट) संघाला जे हवं ते करण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि संघाला एक सूर दिला," असं आर अश्विनने सांगितलं.


भारताने वर्ल्डकप गमावला असला तरी रोहित शर्माचं नेतृत्व आणि स्फोटक फलंदाजीचं कौतुक केलं जात आहे. रोहित शर्माने प्रत्येक सामन्यात स्फोटक फलंदाजी करत संघाला एक चांगली सुरुवात करुन दिली. आर अश्विनने रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. तो सर्व खेळाडूंना समजून घेतो आणि अधिक समजून घेण्यासाठी मेहनत घेतो असं आर अश्विनने सांगितलं आहे. 


"जर तुम्ही भारतीय क्रिकेटकडे पाहिलं तर प्रत्येकजण धोनी सर्वोत्तम कर्णधार असल्याचं सांगेल. रोहित शर्मा एक उत्तम माणूस आहे. तो संघातील प्रत्येकाला समजून घेतो. कोणाला काय आवडतं, काय नाही हे त्याला माहिती आहे. तो प्रत्येक सदस्याला समजून घेण्यासाठी मेहनत घेतो," असं आर अश्विन म्हणाला.


आर अश्विनने यावेळी चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्सवरही भाष्य केलं. "खेळाडूंना ट्रेड करणं, रिलीज करणं ही आयपीएलमधील नेहमीची पद्धत नाही. मुंबई आणि चेन्नईने कधीच आपले खेळाडू दिलेले नाहीत. त्यांनी फक्त खेळाडू घेतले आहेत. ते पाच वेळा जिंकले आहेत. त्यांनी याठिकाणी एक योग्य मंच उभा केला आहे," असं आर अश्विन म्हणाला.


"मी पंजाबचा कर्णधार असताना मुंबई इंडियन्सने डेव्हिड मिलरच्या ट्रेडिंगसाठी रस दाखवला  होता. ते हवा तितका पैसा देण्यास तयार होते. पण ही डील झाली नाही," असा खुलासा आर अश्विनने यावेळी केला.