जोहान्सबर्ग : डावखुरा स्पिनर एश्टन एगर आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये हॅट्रिक घेणारा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला आहे. जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये एगरने फाफ डुप्लेसिस, एंडिल पेहलुक्वायो आणि डेल स्टेनची विकेट घेत हॅट्रिक साजरी केली. याआधी २००७ साली ब्रेट लीने हे रेकॉर्ड केलं होतं. यानंतर १३ वर्षांनंतर एश्टन एगरने ऑस्ट्रेलियाकडून हॅट्रिक घेतली. या हॅट्रिकनंतर एगरने भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आपला गुरु असल्याचं सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवींद्र जडेजा हा माझा आवडता क्रिकेटपटू आहे. भारत दौऱ्यामध्ये माझी आणि त्याची चर्चा झाली. जडेजामुळे मला बरच शिकायला मिळालं, असं एगर म्हणाला आहे. मी जडेजाला रॉकस्टार मानतो. मला जडेजासारखंच ऑलराऊंडर बनायचं आहे, अशी प्रतिक्रिया एगरने दिली.


भारत दौऱ्यावर असताना जडेजाशी बराच वेळ संवाद झाला. त्याने मला खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. मलाही जडेजासारखंच खेळायचं आहे, कारण मला तो आवडतो. जडेजा बॅटिंगमध्ये करिश्मा दाखवू शकतो, तो सर्वोत्कृष्ट फिल्डर आहे आणि तो बॉलही स्पिन करु शकतो. जडेजा काहीही करत असला तरी मैदानात त्याची उपस्थिती नेहमी जाणवते. त्याचा आत्मविश्वासही वाखणण्या जोगा आहे, असं कौतुक एगरने केलं.


एश्टन एगरने या मॅचमध्ये ४ ओव्हर टाकून २४ रन देत ५ विकेट घेतल्या. या कामगिरीबद्दल एगरला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या १९६ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा ८९ रनवर ऑल आऊट झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाने ही मॅच १०७ रननी जिंकली.