जामनगर : भारताचा ऑल राऊंडर आणि आयपीएलच्या चेन्नई टीमचा खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रीवा सोळंकीला पोलिसांकडून मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. रीवा तिच्या बीएमडब्ल्यू गाडीनं जात होती. तेव्हा तिच्या गाडीनं एका पोलिसाच्या बाईकला टक्कर दिली. यानंतर पोलीस आणि तिच्यामध्ये जोरदार भांडण झालं. एवढच नाही तर या पोलिसानं रीवाला मारहाण केल्याचं बोललं जातंय. रीवा आणि पोलिसाची बाचाबाची वाढल्यानंतर बाजूला लोकं जमा झाली आणि त्यांनी रीवाला डीएसपीच्या ऑफिसला पाठवलं. ही घटना जामनगरच्या सारू सेक्शन रोडवर झाल्याची माहिती जामनगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक प्रदीप सेजुल यांनी दिली आहे. रीवाची गाडीनं कॉन्स्टेबलच्या दुचाकीला टक्कर दिली आणि यानंतर पोलिसानं तिला मारहाण करायला सुरुवात केली, असंही सेजुल यांनी सांगितलं. या पोलिसाविरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचं अधिक्षक म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना आपण आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचा दावा विजयसिंग चावडा नावाच्या व्यक्तीनं केला आहे. पोलिसानं रीवाला बेदम मारहाण केली आणि तिचे केसही ओढले. पण आम्ही रीवाला वाचवल्याचं विजयसिंग चावडा म्हणाले. हाय प्रोफाईल केस असल्यामुळे गुजरात पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत. संजय अहिर नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसानं केलेल्या मारहाणीमध्ये जडेजाच्या पत्नीला थोडी जखमही झाल्याची बातमी आहे. रीवा गाडी चालवत होती तर गाडीमध्ये त्यांचा मुलगा आणि जडेजाची आईदेखील होते. रवींद्र जडेजा आणि रीवाचं लग्न १७ एप्रिल २०१६ साली झालं. या दोघांना एक मुलगाही आहे.


रवींद्र जडेजा सध्या चेन्नईकडून आयपीएल खेळत आहे. पहिल्या क्वालिफायर मॅचसाठी जडेजा मुंबईमध्ये आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईचा सामना हैदराबादशी होणार आहे.