IND vs AUS : Ravindra Jadeja वर येणार बॅन? `त्या` कृत्यानंतर बीसीसीआयने दिलं स्पष्टीकरण
बऱ्याच महिन्यांनी कमबॅक करणारा रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) उत्तम कामगिरी करत 5 विकेट्स पटकावले. मात्र अशातच तो एक वादात सापडल्याचंही दिसतंय.
Ravindra Jadeja Video Viral, Ball Tampering: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर सिरीजचा (Border–Gavaskar Trophy) पहिला सामना खेळवला जातोय. पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियावर भारताचा दबदबा दिसून आला. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 177 रन्सवर ऑलआऊट केलं. यामध्ये बऱ्याच महिन्यांनी कमबॅक करणारा रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) उत्तम कामगिरी करत 5 विकेट्स पटकावले. मात्र अशातच तो एक वादात सापडल्याचंही दिसतंय. सोशल मीडियावर (Social Media) जडेजाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यावेळी रविंद्र जडेजावर बॅन येणार का असा सवाल उपस्थित केला जातोय.
नेमकं प्रकरण काय?
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान रवीचंद्रन अश्विनला (R Ashwin) तीन विकेट्स मिळाल्या असून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 450 विकेट्सचा टप्पा गाठला आहे. मात्र या सामन्यादरम्यान जाडेजाच्या एका व्हिडीओमुळे वाद उपस्थित झाला आहे.
रवींद्र जडेजाने गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजकडून काहीतरी घेतलं आणि ते आपल्या बोटावर चोळलं. ही गोष्ट नेमकी काय होती हे त्या व्हिडीओत दिसत नाही. पण जाडेजा ती गोष्ट बोटाला लावताना स्पष्ट दिसत आहे. आता हे नेमकं काय होतं यावरुन वाद निर्माण झाला आहे.
ऑस्ट्रेलियामधील स्थानिक प्रसारमाध्यम foxsports.com.au ने यावर एक रिपोर्ट तयार केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतामधील पहिल्या सामन्यादरम्यान प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक घटना घडली आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
इंग्लंडच्या माजी खेळाडूंची टीका
इंग्लंडचा माजी क्रिकेटर आणि समालोचक मायकल वॉननेही (Michel Vaughan) यावर प्रतिक्रिया दिली आहे. "फिरकीसाठी वापरणाऱ्या आपल्या बोटावर जाडेजा काय लावत आहे? याआधी असं काही पाहिलेलं नाही", असं ट्वीट मायकल वॉनने केलं आहे. इतकंट नाही तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने (Tim Paine) या व्हिडीओवर व्यक्त होताना "Interesting" अशी कमेंट केलीये.
बीसीसीआयने दिलं स्पष्टीकरण
यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळा म्हणजेच बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने या प्रकरणाची माहिती दिलीये. बोर्डाच्या सूत्रांनी पीटीआयला माहिती देताना सांगितलं की, 'हे बोटातील वेदना कमी करण्यासाठीचं एक मलम' आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलियन टीमचे सदस्य डेव्हिड वॉर्नर आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांना 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी एका वर्षाच्या बंदीला सामोरं जावं लागलं होतं.