Rohit Sharma: खरंच जिंकलो? विश्वास बसत नाहीये...; विजयानंतरही वारंवार का खात्री करतोय रोहित शर्मा?
Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्याच्या भावनेबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, `ही भावना खूप वेगळी आहे. तो क्षणच माझ्यासाठी भारी होता. माझ्यासाठी हे एका स्वप्नासारखं होतं
Rohit Sharma: शनिवारी रात्री रोहित शर्माने सर्व भारतीय चाहत्यांच्या मनातील गोष्ट सत्यात उतरवली. टी-20 वर्ल्डकपच्या फायनल सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 रन्सने पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. यासह भारताला विश्वविजेता बनवणारा रोहित शर्मा हा तिसरा कर्णधार ठरला आहे. वर्ल्डकप जिंकल्याच्या नेमक्या काय भावना आहेत, या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहितने सांगितल्या आहेत. वर्ल्डकप जिंकणं हे आपल्या स्वप्नासारखं असल्याचं रोहितने म्हटलंय.
माझा विश्वासच बसत नाहीये- रोहित शर्मा
वर्ल्डकप जिंकण्याच्या भावनेबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "ही भावना खूप वेगळी आहे. तो क्षणच माझ्यासाठी भारी होता. माझ्यासाठी हे एका स्वप्नासारखं होतं. आम्हाला अजूनही असं वाटतंय की हे घडलेलंच नाही. खरंतर हे घडलंय, आम्ही वर्ल्डकप जिंकलो आहोत, पण तरीही हे घडलं नाहीये यावर माझा विश्वास बसत नाही. हीच भावना सतत मनात आहे."
आम्ही दीर्घकाळापासून वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं. यासाठी आम्ही एक टीम म्हणून खूप मेहनत घेतली आहे आणि त्यानंतर आता ही वर्ल्डकपची ट्रॉफी आमच्यासोबत असणं ही गोष्ट अत्यंत दिलासादायक आहे. ज्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत घेता आणि अखेरीस तुम्हाला ती गोष्ट मिळते ही भावनाच तुमच्यासाठी सर्वकाही असते, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.
'त्या क्षणाच्या प्रत्येक सेकंदात मला जगायचं होतं'
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला की, वर्ल्डकप जिंकल्याच्या रात्री आम्ही पहाट होईपर्यंत सेलिब्रेशन केलं. त्यामुळे मी पुन्हा म्हणेन की, मला झोप मिळाली नाही, पण आता ही गोष्टी माझ्यासाठी ठीक आहे. इतक्या महत्त्वाच्या दिवसानंतर तुम्हाला झोप मिळाली तर त्यासाठी माझी काहीही हरकत नाहीये. मी घरी पोहोचल्यानंतर नक्कीच या झोपेची भरपाई करेन. पण जसं मी म्हटलं, हा क्षण माझ्यासाठी सर्वकाही होता आणि त्या क्षणाच्या प्रत्येक सेकंदात, मिनिटात मला जगायचं होतं. मला नाही वाटतं मी या गोष्टींचं वर्णन करू शकेन, कारण यामधील कोणतीही गोष्ट स्क्रिप्टेड नव्हती.
रोहित शर्माची टी-20 फॉर्मेटमधून निवृत्ती
टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपली मोहोर उमटवली. वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला खरा, पण यावेळी भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने वर्ल्ड कप जिंकताच निवृत्ती जाहीर केले होती. त्यानंतर आता विराटनंतर रोहित शर्माने सुद्धा सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आपण टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केलं.