मुंबई : एकाच वेळी लाभाची दोन पदं उपभोगल्याची तक्रार सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही. एस. लक्ष्मण विरोधात दाखल करण्यात आली आहे. लोकपाल डी. के. जैन यांच्याकडे सचिनने यासंदर्भातील आपलं उत्तर पाठवलं आहे. या चौदा कलमी उत्तरात त्याने आपली बाजू मांडत काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मुंबई इंडियन्स या संघाकडून आपल्याला कोणताही आर्थिक फायदा मिळालेला नाही, किंबहुना मुंबई इंडियन्सचं असं कोणतंही पद नाही असं स्पष्ट उत्तर सचिन तेंडुलकरने दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी तेंडुलकर आणि लक्ष्मण हे आयपीएल संघासोबतच क्रिकेट सल्लागार समितीच्याही पदाचा उपभोग घेत असल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती. पण, खुद्द सचिनने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. 


'मुंबई इंडियन्सकडून आपल्याला कोणताही आर्थिक लाभ किंवा भरपाई मिळालेली नाही, इतकच नव्हे तर निवृत्तीनंतर मुंबईच्या संघासोबत खेळलेलोही नाही. या संघासाठी मी कोणतंही पद भूषवलं नसून, त्यांच्या निर्णय प्रक्रियेतही आपला काहीच सहभाग नाही', असं सचिनने स्पष्ट केलं. मुंबईच्या संघाशी असणाऱ्या संबंधांविषयी बीसीसीआयला पूर्ण कल्पना दिल्याचंही त्याने सांगितलं. 


मुंबईच्या संघाकडून सचिनला मिळालेलं आयकॉन हे पद फक्त एक बिरुद आहे. कारण, अशा नावाचं कोणतंही लाभाचं पद या संघात नाही. कारण आयकॉन हा केवळ संघ आणि व्यवस्थापनाशी निगडीत एका मार्गदर्शकाच्या भूमिकेतच आहे, ही महत्त्वाची बाब त्याच्याकडून मांडण्यात आली. संघाकडे स्वत:चा प्रशिक्षक असून, आपण त्या प्रशिक्षकाशीही बांधील नसल्याचं सचिनने या स्पष्टीकरणात सांगितलं आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची क्रिकेट वर्तुळात बरीच चर्चा होताना दिसत आहे.