क्राईस्टचर्च : भारत आणि पाकिस्तानमध्ये मंगळवारी अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपची सेमी फायनल होणार आहे. या मॅचमध्ये विजय मिळवलेली टीम फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. मॅच सुरु होण्यापूर्वी पृथ्वी शॉच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताचं पारडं जड वाटतंय. यंदाच्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये भारतानं एकही मॅच गमावलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही मॅच जिंकण्यासाठी भारतीय टीमचं पारडं जड असलं तरी रेकॉर्ड मात्र पाकिस्तानच्या बाजूनं आहे. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं भारताचा एकदाही पराभव केलेला नसला तरी अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये मात्र पाकिस्ताननं बहुतेकवेळा भारताला पराभूत केलं आहे. अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये ७ मॅच झाल्या. या ७ पैकी ४ मॅचमध्ये पाकिस्तानचा तर ३ मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे.


१९९८ साली दक्षिण आफ्रिकेच्या डरबनमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये सुपर लीग स्टेजची मॅच झाली होती. ही मॅच भारतानं ५ विकेटनं जिंकली होती. १९९८च्या वर्ल्ड कपमधली भारताची ही शेवटची मॅच होती.


२००२ साली झालेल्या सुपर लीग मॅचमध्ये पाकिस्ताननं भारताचा २ विकेट्सनं पराभव केला होता. २००२च्या वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला होता.


२००४ साली बांग्लादेशमध्ये झालेल्या अंडर १९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पाकिस्ताननं भारतावर ५ विकेट्सनं विजय मिळवला होता. याचवर्षी पाकिस्ताननं अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा २५ रन्सनं विजय झाला.


२००६ सालची अंडर १९ वर्ल्ड कप फायनल भारत आणि पाकिस्तानमध्ये झाली होती. या मॅचमध्ये पाकिस्तानचा ३८ रन्सनं विजय झाला होता. पहिले बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानचा १०९ रन्सवर ऑल आऊट झाला होता. पण ११० रन्सचा पाठलाग करताना भारताचा ७४ रन्सवर ऑल आऊट झाला.


२०१० सालच्या अंडर १९ वर्ल्ड कपची चौथी क्वार्टर फायनल भारत आणि पाकिस्तानमध्ये झाली. या मॅचमध्ये पाकिस्तानचा २ विकेट्सनं विजय झाला. या पराभवाबरोबरच वर्ल्ड कपमधलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं. या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पाकिस्ताननं वेस्ट इंडिजला पराभूत केलं पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला २५ रन्सनी धूळ चारली.


२०१२ साली झालेल्या तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये सामना झाला होता. या मॅचमध्ये भारताचा १ विकेटनं विजय झाला होता. या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये भारतानं न्यूझीलंडचा ९ रन्सनं पराभव केला. तर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. फायनलमध्ये उन्मुक्त चंदच्या १११ रन्समुळे भारतानं ऑस्ट्रेलियानं ठेवलेलं २२६ रन्सचं लक्ष्य पार केलं.


२०१४ सालच्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्येही या दोन्ही टीम एकमेकांना भिडल्या होत्या. या मॅचमध्ये भारताचा ४० रन्सनं विजय झाला होता. या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये भारताचा इंग्लंडकडून पराभव झाला तर पाकिस्तानला फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ६ विकेट्सनं धूळ चारली.