दुबई :  आयपीएल सुरू होण्याआधीच चेन्नईच्या टीममध्ये वादाची ठिणगी पडल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. याच कारणामुळे सुरेश रैना आयपीएल सोडून भारतात परतला असल्याचं समजतंय. युएईच्या हॉटेलमध्ये मिळालेल्या रुमवरुन सुरेश रैना नाराज झाल्याचं आएएनएस या वृत्तसंस्थेने सांगितलं आहे. रैनाने सांगितलेलं कारण मुर्खपणाचं असल्याचंही सूत्राने आएएनएस बोलताना सांगितलं. चेन्नईच्या टीमसोबत रैना युएईमध्ये आला तेव्हापासूनच सुरुवात झाली. चेन्नईच्या टीममधल्या इतर खेळाडूंनी रैनाला समजवायचा प्रयत्न केला, पण त्याने कोणाचंच ऐकलं नसल्याचा दावा सूत्राने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईच्या टीमचे मालक एन. श्रीनिवासन यांनी सुरेश रैनावर गंभीर आरोप केले आहेत. कोरोना व्हायरसमुळे तयार करण्यात आलेल्या बायो-बबल नियम रैनाला भीतीधायक वाटत होते, तसंच त्याला चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी प्रमाणे बाल्कनी असलेली रुम हवी होती. रैनाच्या अचानक जाण्यामुळे टीम धक्क्यात होती, पण धोनी मात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होता, असं श्रीनिवासन म्हणाले. 


'चेन्नईची टीम नेहमीच कुटुंबासारखी राहिली आहे. जर तुम्ही इच्छूक नसाल आणि नाखूश असाल तर परत जा. मी कोणालाही कोणतीही जबरदस्ती करु शकत नाही. काही वेळा यश तुमच्या डोक्यात जातं. मोसमाला अजून सुरुवात झाली नाहीये. तो काय गमवतोय, हे त्याच्या लक्षात येईल. तो सगळे पैसे (एका मोसमाचे ११ कोटी) गमावणार आहे', असं वक्तव्य एन. श्रीनिवासन यांनी केलं आहे. 


चेन्नईच्या टीममधल्या १३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, यातले २ खेळाडू तर बाकीचे सपोर्ट स्टाफमधले आहेत. यावरही श्रीनिवासन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मी धोनीशी बोललो. संख्या वाढली तरी काळजी करायचं कारण नाही, असं धोनी म्हणाला. तसंच त्याने खेळाडूंशी झूमवरुन चर्चा केली आणि सुरक्षित राहायला सांगितलं. 


रैनाच्या जाण्यामुळे ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते, तो उत्कृष्ट बॅट्समन आहे. ऋतुराज चेन्नईच्या टीमचा स्टार होऊ शकतो, असं श्रीनिवासन म्हणाले आहेत.