नवी दिल्ली : भारतीय कबड्डी टीमने पाकिस्तानमध्ये जाण्याबाबत वाद निर्माण झाला आहे. भारतीय कबड्डी टीमचा फायनलमध्ये पाकिस्तानने पराभव केला, यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदनाचं ट्विट केलं. या ट्विटनंतर हा वाद आणखी वाढला. आता केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी एमेच्योर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनाधिकारिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी परवानगीची गरज लागत नाही, अशी सारवासारव आयोजनकर्त्यांनी केली आहे. या वादावर रिजिजू म्हणाले की 'आमची अधिकृत कबड्डी टीम पाकिस्तानमध्ये गेली नाही. तिकडे कोण गेलं ते आम्हाला माहिती नाही. भारताच्या नावावर एखादी अनधिकृत टीम कुठे जाऊन खेळत असेल, तर हे योग्य नाही. आम्ही कोणतीही अधिकृत टीम पाठवली नव्हती.'


'आम्ही कबड्डी महासंघाला याप्रकरणाची चौकशी करायला आणि परवानगी न घेता भारताच्या नावाचा वापर करुन त्याठिकाणी खेळायला गेलेल्या लोकांची माहिती घ्यायला सांगू. कोणत्याही मान्यता प्राप्त स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी खेळ आणि राष्ट्रीय महासंघाची मंजुरी घेणं अनिवार्य आहे,' असं किरेन रिजिजू म्हणाले.


अनधिकृत टीमचे प्रमोटर देविंदर सिंग बाजवा यांनी पाकिस्तानमधून परत आल्यानंतर या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. 'स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्हाला कोणत्याच संघाची परवानगी घ्यायची गरज नाही, कारण आम्ही तिकडे व्यक्तिगतरित्या गेलो होते,' असं वक्तव्य बाजवा यांनी केलं आहे.