Rinku Singh IPL 2024: भारतीय आणि आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचा मधल्या फळीतील फलंदाज रिंकू सिंगने वरिष्ठ पातळीवर खेळताना ट्रॉफी हातात उचलून घेण्याचं स्वप्न असल्याचं म्हटलं आहे. रिंकू सिंगला वर्ल्डकप टी-20 संघात स्थान मिळालं नसून, राखीव खेळाडू म्हणून संघासह प्रवास करणार आहे. 1 जूनपासून वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. दरम्यान दुसरीकडे रिंक सिंग फायनलमध्ये दाखल झालेल्या कोलकाता संघाकडूनही खेळत आहे. गतवर्षी रिंकूने 59.25 च्या सरासरीने 474 धावा केल्या होत्या. मात्र या हंगामात त्याची कामगिरी चांगली झाली नाही. त्याने 11 डावात 18.66 च्या सरासरीने केवळ 168 धावा केल्या. 26 त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. रिंकूची आयपीएल 2024 निराशाजनक ठरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आयपीएलमधील निराशाजनक कामगिरी आणि टी-20 संघात स्थान न मिळाल्याने रिंकू सिंग खचलेला नाही. रिंकूने 2023 मध्ये आयर्लंडविरुद्ध टी-20 मध्ये पदार्पण केलं त्यानंतर त्याने 15 सामने आणि 11 डाव खेळले ज्यात त्याने 89.00 च्या सरासरीने आणि 176.24 च्या स्ट्राइक रेटने 356 धावा केल्या. जानेवारी 2024 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध भारतासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता.


"मी क्रिकेट खेळत आहे तेव्हापासून ज्युनिअर स्तरावर ट्रॉफी जिंकल्या आहेत. पण सिनिअर लेव्हलला जिंकू शकलेलो नाही. मी वर्ल्डकपसाठी जात आहे. मला वर्ल्डकप ट्रॉफी हातात पकडायची आहे. आम्ही जिंकू अशी आशा आहे. देशासाठी मोठी ट्रॉफी जिंकण्याचं आणि ती हातात उचलून घेण्याचं माझं स्वप्न आहे." असं रिंकू म्हणाला आहे.


एखाद्या वाईट वेळेतून जात असल्याच्या कल्पनेवर बोलताना रिंकूने म्हटवं की, "वेळ त्याची खराब असते ज्याचे हात-पाय नसतात. आपल्याकडे तर आहेत. आमची वेळ खराब नाही".


गुजरात टायटन्सविरोधात खेळताना यश दयालच्या शेवटच्या षटकात ठोकलेल्या त्या सलग पाच षटकारांवरवरही रिंकून भाष्य केलं. "मी नेहमी मला पुढे खेळण्याची संधी मिळेल का याचा विचार करायचो. पुढील सामन्यात मी चांगली कामगिरी करेन आणि मेहनत घेईन असं मी स्वत:ला सांगायचो. त्या 5 षटकारांनंतर माझं आयुष्य बदललं. मला जाहिराती मिळाल्या, लोक ओळखू लागले. मी आता एकटा फिरु शकत नाही. माझ्या नावाचे होर्डिंग पाहिल्यानंतर मला बरं वाटतं. लोक माझं नाव घेऊन ओरडतात तेव्हा आपण आयुष्यात काहीतरी विशेष केलं आहे असं वाटतं," अशी भावना रिंकूने व्यक्त केली.


तसंच लोक आपल्याला अनेकदा रिंकू तुझं खरं नाव आहे की, घरात प्रेमाने हाक मारलं जाणारं नाव आहे अशी विचारणाही करत असल्याचं त्याने सांगितलं. आपण कधी सलग 5 षटकार लावू असं वाटलं नव्हतं, पण आयुष्याने ते करुन दाखवलं अशसं समाधान त्याने व्यक्त केलं. देव कुठेकरी तुमच्या चांगल्याचा विचार करत असतो. ही देवाची योजना आहे असंच मी सांगेन असं तो म्हणाला. 


मधल्या फळीत फिनिशर म्हणून खेळण्याच्या भूमिकेवर रिंकू म्हणाला, "मी बराच काळ या क्रमांकावर खेळत आहे. मला माहित आहे की काय करायचे आहे. तुम्ही जितके शांत राहाल तितके अधिक तुम्ही फक्त बॉलवर व्यक्त होऊ शकता".


दरम्यान कोलकाता संघ हैदराबादचा पराभव करत थेट अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. आज बंगळुरु आणि राजस्थान यांच्यात सामना होणार आहे.