मुंबई : यंदाच्या आयपीएल सिझनमध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारी कोलकाता नाइट रायडर्स ही तिसरी टीम आहे. लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्ध झालेल्या पराभवानंतर कोलकाताची टीमही प्लेऑफ गाठू शकणार नाहीये. मात्र या सामन्यात केकेआरचा खेळाडू रिंकू सिंह त्याच्या उत्तम खेळीने सर्वांची मनं जिंकली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिंकू सिंगने 15 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी खेळली आणि या खेळीत त्याने 2 चौकार आणि 4 सिक्स मारले. एकवेळ अशी आली होती ज्यावेळी रिंकू केकेआरला विजय मिळवून देईल असं वाटत होतं. पण शेवटच्या ओव्हरमध्ये एविन लुईसने त्याच्या कॅच घेतला आणि त्याची खेळी संपवली.


आऊट झाल्यानंतर रिंकूही थोडा निराश दिसला. केकेआरचा 2 रन्सने पराभव झाला तेव्हा त्याला अश्रू अनावर झाले होते. यावेळी त्याचा मित्र नितीश राणा रिंकूचं सांत्वन करताना दिसला.


केकेआरला शेवटच्या चेंडूवर ३ रन्सची गरज होती. उमेश यादवने स्टॉइनिसच्या शेवटच्या बॉलचा सामना केला पण गोलंदाजाने यॉर्कर टाकला. यावेळी तो बोल्ड झाला. यामुळे केकेआरला 2 रन्सने पराभवाला सामोरं जावं लागलं. त्याचवेळी केकेआरचा आयपीएलमधील प्रवास संपुष्टात आला.


शेवटच्या ओव्हरमध्ये केकेआरला विजयासाठी 21 रन्सची गरज होती. स्टॉइनिसच्या पहिल्या बॉलवरवर रिंकूने चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर सिक्स मारला. यानंतर तिसऱ्या चेंडूवरही रिंकूने सिक्स ठोकला. यानंतर सामना केकेआरच्या हातात होता. चौथ्या बॉलवर रिंकूने 2 रन्स घेतले. 


स्टॉइनिसच्या पाचव्या बॉलवर रिंकूने शॉट मारला पण बॉलचा बॅटशी योग्य संपर्क झाला नाही. त्यामुळे चेंडू हवेत बॅकवर्ड पॉइंटकडे गेला. यानंतर एविन लुईस धावला आणि अप्रतिम झेल घेऊन रिंकूची खेळी संपली.