मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १३७ रननी विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये २-१नं आघाडी घेतली आहे. पुजाराचं शतक आणि त्याला भारताच्या इतर बॅट्समननी दिलेली साथ, जसप्रीत बुमराहनं घेतलेल्या ९ विकेट ही भारताच्या विजयाची मुख्य कारणं ठरली. पण मैदानामध्ये ऋषभ पंत आणि टीम पेन यांच्यामध्ये झालेली शाब्दिक चकमक क्रिकेट रसिकांच्या चांगलीच लक्षात राहिली. या दोघांनी एकमेकांना मारलेले टोमणे स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झाले. टीम पेननं काढलेल्या चिमट्याला ऋषभ पंतनंही चोख प्रत्युत्तर दिलं.


काय म्हणाला ऋषभ पंत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन बॅटिंगसाठी मैदानात आला. तेव्हा ऋषभ पंतनं त्याला स्लेजिंग करायला सुरुवात केली. पेन बॅटिंगला आलेला असताना मयंक अग्रवाल सिली पॉईंटला फिल्डिंगसाठी उभा होता. तेव्हा मयंककडे बघून पंत बोलू लागला. आता मैदानात एक नवा पाहुणा आला आहे. मयंक तु कधी अस्थायी कर्णधार बघितला आहेस का? कर्णधारानं त्यांना काहीच जबाबदारी सोपावली नाहीये. याला आऊट करण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. त्याला फक्त गप्पा मारायला आवडतं, तो दुसरं काहीही करू शकत नाही, असं पंत टीम पेनला म्हणाला.



अंपायरचा पंतला समज


ऋषभ पंत वारंवार टीम पेनचं स्लेजिंग करत असल्यामुळे अंपायरनी ऋषभ पंतला समज दिली. अंपायरनी समजवल्यावर पंत शांत झाला.


टीम पेननं केली सुरुवात


खरंतर या सगळ्या स्लेजिंगची सुरुवात टीम पेननं केली होती. ऋषभ पंत बॅटिंगला आलेला असताना त्याची वनडे टीममध्ये निवड न झाल्यामुळे पेननं निशाणा साधला. वनडे सीरिजसाठी एमएस धोनीची निवड झाली आहे. पंतला आता बीबीएलच्या होबार्ट हरिकेन्स टीममध्ये घ्यायला हवं. त्यांना एका बॅट्समनची गरज आहे. यामुळे तुझी ऑस्ट्रेलियातली सुट्टी लांबेल. होबार्ट चांगलं शहर आहे. याला एक वॉटर-फ्रंट अपार्टमेंट देण्याचाही विचार करू, असं टीम पेन पंतला म्हणाला.



एवढंच बोलून टीम पेन थांबला नाही. माझ्या मुलांना सांभाळशील का? मी माझ्या पत्नीला पिक्चरला घेऊन जाईन, तेव्हा तू माझ्या मुलांना सांभाळ, असं पेन पंतला उद्देशून म्हणाला. या दोघांची ही शाब्दिक चकमक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.