दुसरी टेस्ट सुरु होण्याआधी या भारतीय खेळाडूच्या नको त्या कसरती
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या टेस्ट मॅचआधी भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत. आर. अश्विनला पोटाच्या मांसपेशींना झालेल्या दुखापतीमुळे आणि रोहित शर्माला पाठीला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या टेस्टला मुकावं लागणार आहे. तर दुसरीकडे सराव सामन्यादरम्यान भारताचा ओपनर पृथ्वी शॉच्या पावलाला दुखापत झाल्यामुळे तोदेखील खेळू शकणार नाही.
आधीच भारतीय टीमला दुखापतीनं ग्रासलं असतानाच भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतनं मैदानात केलेल्या नकोत्या कसरतीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ऋषभ पंतनं डोकं खाली आणि पाय वर केले असून तो हातानं चालायचा प्रयत्न करताना दिसत आहे.
पुन्हा ती चूक करु नकोस, शास्त्रींचा इशारा
पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंतनं ३८ बॉलमध्ये २५ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १६ बॉलमध्ये झटपट २८ रनची खेळी केली. ऋषभ पंतच्या दुसऱ्या इनिंगमधल्या खेळीवर अनेकांनी टीका केली. भारतीय टीमला गरज असताना पंतनं बेजबाबदार फटके मारल्याचा आक्षेप काही माजी क्रिकेटपटूंनी घेतला. यावर भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ऋषभ पंतला इशारा दिला. पंतला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू द्या. त्याला आणखी थोडी जबाबदारी दाखवावी लागेल. पण त्यानं ही चूक पुन्हा करता कामा नये, असं शास्त्री म्हणाले.
पंतनं यशाचं श्रेय धोनीला दिलं
पहिल्या मॅचमध्ये भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतनं विश्वविक्रमाशी बरोबरी केली. ऋषभ पंतनं या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ६ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ५ असे एकूण ११ कॅच घेतले. याआधी जॅक रसेल यांनी १९९५ साली इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये आणि एबी डिव्हिलियर्सनं २०१३ साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचमध्ये ११ कॅच घेतले होते.
भारताकडून सर्वाधिक कॅच घेणाच्या विक्रम याआधी ऋद्धीमान सहाच्या नावावर होता. पंतनं २०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये १० कॅच घेतले होते. बॉब टेलर आणि ऍडम गिलख्रिस्ट यांच्या नावावरही १० कॅचचं रेकॉर्ड आहे.
भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कॅच घेण्याचं रेकॉर्ड याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होतं. २०१४ साली मेलबर्नमध्ये धोनीनं ९ कॅच घेतले होते.
ऋषभ पंतनं त्याच्या यशाचं श्रेय धोनीला दिलं आहे. धोनीनं मला संयम ठेवायला आणि तणावाच्या परिस्थितीतं कसं वागायचं हे शिकवलं असल्याचं पंत म्हणाला. तसंच धोनी हाच देशाचा हिरो असल्याची प्रतिक्रिया पंतनं दिली. धोनी जेव्हा आजूबाजूला असतो तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. मला कोणतीही अडचण असेल तर मी धोनीला फोन करतो. धोनी मला नेहमी या अडचणींवर उपाय सांगतो, असं वक्तव्य ऋषभ पंतनं केलं.
ऋषभ पंतनं त्याच्या पहिल्याच टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ५ कॅच पकडण्याचं रेकॉर्डही केलं होतं. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये हे रेकॉर्ड करणारा पंत पहिला भारतीय आहे. यावर्षी नॉटिंगहम टेस्टमध्ये पंतनं हे रेकॉर्ड केलं होतं.