मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारताचा 4-1नं पराभव झाला. भारतानं पाचवी टेस्ट मॅच 118 रननी गमावली. पाचव्या टेस्टमधल्या पराभवानंतरही भारतीय टीममध्ये अनेक सकारात्मक गोष्टी दिसल्या ज्या पहिल्या 4 टेस्ट मॅचमध्ये दिसल्या नाहीत. आपली पहिलीच टेस्ट मॅच खेळणाऱ्या हनुमा विहारीनं पहिल्याच इनिंगमध्ये अर्धशतक केलं. लोकेश राहुल आणि ऋषभ पंतनं शेवटच्या इनिंगमध्ये शतक झळकवलं. 20 वर्षांच्या पंतनं केलेल्या शतकानं रेकॉर्ड केलं. पण या पराभवामध्ये पंतचं हे रेकॉर्ड हरवून गेलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ पंत हा पहिला भारतीय विकेट कीपर आहे ज्यानं चौथ्या इनिंगमध्ये शतक केलं. याआधी महेंद्रसिंग धोनीनं 2007 साली इंग्लंडविरुद्ध चौथ्या इनिंगमध्ये 76 रन केले होते. ऋषभ पंत आणि लोकेश राहुलनं सहाव्या विकेटसाठी 204 रनची पार्टनरशीप केली होती. पण आदिल रशीदनं या दोघांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आणि इंग्लंडचा विजय सोपा केला.


ऋषभ पंतच्या विकेट कीपिंगवर या सीरिजमध्ये टीका झाली पण शेवटच्या इनिंगमध्ये शतक मारून पंतनं या टीकेची धार कमी केली. पंतच्या खेळीमध्ये 15 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. ऋषभ पंतनं या इनिंगमध्ये 114 रन केले होते.