लंडन : अंगठ्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा गब्बर सलामीवीर शिखर धवनला वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे टीम इंडियाला हा मोठा धक्का समजला जात आहे. टीम इंडियामध्ये आता शिखर धवनऐवजी युवा ऋषभ पंत याला संधी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखर धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी बॅटिंग करताना डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.' धवनला झालेल्या दुखापतीमुळे त्याला २-३ मॅचला मुकावे लागणार असल्याची माहिती बीसीसीआयने तेव्हा दिली होती. धवनला बॅकअप म्हणून काही दिवसांपूर्वी ऋषभ पंत इंग्लंडला रवाना झाला होता.


ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये शिखर धवनने तडाखेदार शतकीय कामगिरी केली होती. शिखरने ११७ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा वेगवान बॉलर नॅथन कुल्टर नाईलने टाकलेल्या बॉलवर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.


शिखर धवनने २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी केली होती. २०१५ च्या वर्ल्डकमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर होता. शिखरने ८ मॅचमध्ये ५१ च्या सरासरीने ४१२ रन केल्या होत्या. तर यात  १३७ रनची सर्वोत्तम खेळी केली होती.  


नशीबवान ऋषभ पंत


वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची १५ एप्रिलला निवड करण्यात आली होती. यावेळेस युवा ऋषभ पंतला संधी मिळेल, अशी शक्यता आणि चर्चा पाहायला मिळत होती. परंतु ऋषभ पंतला दिनेश कार्तिकच्या अनुभवामुळे डच्चू मिळाला. त्यामुळे पंतच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पण अखेरी ऋषभ पंतला वर्ल्डकपमध्ये टीम इंडियात स्थान मिळाले आहे. टीम इंडियाचा पुढील सामना २२ जूनला अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे.