नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिली. दिल्लीच्या या निराशाजनक कामगिरीवर दिल्लीचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलवर टीका करण्यात येत आहे. दिल्लीनं ग्लेन मॅक्सवेलसाठी तब्बल ९ कोटी रुपये खर्च केले होते. एवढे पैसे खर्च करून सगळ्यात खराब कामगिरी करणाऱ्यांपैकी मॅक्सवेल आहे. मॅक्सवेलनं १२ मॅचमध्ये १४०.८३ च्या सरासरीनं १६९ रन केल्या आहेत. ४७ रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. ग्लेन मॅक्सवेलला वारंवार संधी दिल्यामुळे दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉटिंगवरही आक्षेप घेण्यात आले. या सगळ्या वादावर अखेर रिकी पॉटिंगनं मौन सोडलं आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या खराब कामगिरीला ऋषभ पंत जबाबदार असल्याचं पॉटिंग म्हणाला आहे. लिलावासाठी जाताना आम्ही काही खेळाडूंची नावं निश्चित केली होती. मॅक्सवेल हे त्यातलंच एक नाव होतं. ग्लेन मॅक्सवेल हा दिल्लीसाठी ४ नंबरवर खेळेल हे तेव्हा निश्चित झालं होतं. अॅरन फिंचच्या लग्नामुळे मॅक्सवेलला पहिल्या मॅचला मुकावं लागलं होतं. या मॅचमध्ये ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला आणि चांगली खेळी करून गेल्याचं पॉटिंग म्हणाला.


पॉटिंगचा दावा खोटा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉटिंगनं केलेल्या या दाव्यात मात्र काहीही तथ्य नाही. या मॅचमध्ये पंत पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. तर विजय शंकर चौथ्या क्रमांकावर आला होता. शंकरनं या मॅचमध्ये १३ बॉलमध्ये १३ रन केल्या. टीममध्ये दाखल झाल्यावर मॅक्सवेलनं वेगवेगळ्या ठिकाणी बॅटिंग केली. ओपनर म्हणून मॅक्सवेलनं १७, २ आणि २२ रन केल्या. चौथ्या क्रमांकावर १३ आणि ५, पाचव्या क्रमांकावर ४७, ४, २७, ६ आणि ५, सहाव्या क्रमांकावर ९ आणि तिसऱ्या क्रमांकावर १२ रन केल्या.


आयपीएलआधी ऑस्ट्रेलियानं खेळलेल्या ट्रायसीरिजमध्ये मॅक्सवेलनं रन केल्या होत्या. या सीरिजमध्ये तो मॅन ऑफ द सीरिज होता. त्यामुळे आयपीएलमध्ये येताना तो फॉर्ममध्ये होता, असं वक्तव्य पॉटिंगनं केलं आहे.


पंतचं जबरदस्त रेकॉर्ड


दिल्लीच्या ऋषभ पंतनं यावर्षी ६८४ रन केल्या. यंदाच्या आयपीएलमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे. त्यामुळे ऋषभ पंतलाच यावर्षी ऑरेंज कॅप मिळाली. कोणत्याही विकेट कीपरनं एका मोसमात एवढा स्कोअर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मोसमामध्ये पंत ८ वेळा चौथ्या क्रमांकावर आणि ४ वेळा तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता.