अबुधाबी : मांडीच्या स्नायूच्या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटलचा विकेटकीपर आणि धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंत आयपीएल २०२० च्या आगामी काही सामन्यात कमीतकमी एका आठवडे भाग घेऊ शकणार नाही. दिल्ली संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर यांने ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

9 ऑक्टोबर रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान ऋषभ पंतला दुखापत झाली होती. तो रविवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. दिल्ली संघाने हा सामना 5 विकेटने गमावला होता.


सामन्यानंतर श्रेयस अय्यर याला ऋषभ पंत किती वेळ खेळू शकणार नाही असं विचारल्यानंतर त्याने म्हटलं की, 'मला माहित नाही. डॉक्टर म्हणाले की, त्याला आठवडाभर विश्रांती घ्यावी लागेल आणि मला आशा आहे की तो परत येईल.'


दिल्लीचा 14 ऑक्टोबरला राजस्थान रॉयल्स आणि 17 ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्ज सोबत सामना होणार आहे. रविवारी पंतच्या ऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स कॅरीचा समावेश करण्यात आला होता.