मुंबई : टी-20 वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत नवा वाद समोर आला आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू वकार युनूसने म्हटलं की, सामन्याच्या शेवटी मोहम्मद रिझवानने हिंदूंसमोर जो नमाज पडला तो खूप खास होता. यानंतर हर्षा भोगले आणि व्यंकटेश प्रसाद यांसारख्या दिग्गजांनी यावर नाराजी व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर युनूसने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आणि खेळामुळे माणसं जोडली जातात, असं सांगितलं. युनूसचे विधान वादग्रस्त असल्याचं सांगून हर्षा भोगले म्हणाले की, क्रिकेट जगताने एकत्र येण्याची गरज आहे. दुसरीकडे व्यंकटेश प्रसाद यांनी त्यांचं वक्तव्य लज्जास्पद असल्याचं म्हटलं होतं.



वकार यांनी ट्विटद्वारे आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्यांनी लिहिलं की, "त्यावेळी मी असं काहीतरी बोलून गेलो जे मला म्हणायचं नव्हतं. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याबद्दल मी माफी मागतो. मी हे जाणूनबुजून केलेलं नाही. ही चूक होती. जात, रंग किंवा धर्माचा विचार न करता खेळ लोकांना जोडतो."


काय म्हणाले होते वकार यूनूस


एका न्यूजशी बोलताना वकार म्हणाले होते, "बाबर आणि रिझवान यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यांनी ज्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट केला, ज्या प्रकारे त्यांचा चेहरा होता ते आश्चर्यकारक होतं. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी हिंदूंनी भरलेल्या मैदानात नमाज अदा केला. माझ्यासाठी ते खरोखरच खूप खास होते."


भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर रिझवानने मैदानात नमाज अदा करतानाचा एक व्हिडिओ समोर आला. दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला होता.



पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये त्यांनी या सामन्यात जगभरातील मुस्लिमांच्या भावना पाकिस्तानसोबत असल्याचं म्हटलं होतं. भारतातील मुस्लिमही पाकिस्तानसोबत होते असं त्यांचं विधान होतं. त्यांच्या या विधानावरून चांगलाच गदारोळ माजला होता.