रोहितने लगावला सिक्स आणि चेंडू थेट डगआऊटमध्ये बसलेल्या कोहलीपाशी पोहोचला!
बुधवारी झालेल्या सामन्यात रोहितने 47 चेंडूत 74 धावांची धडाकेबाज खेळी केली.
दुबई : टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध जोरदार खेळला. बुधवारी झालेल्या सामन्यात रोहितने 47 चेंडूत 74 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या खेळीमुळे भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव करून 2021च्या T20 वर्ल्डकपमध्ये पहिला विजय नोंदवला.
'हिटमॅन'ने त्याच्या 8 चौकार आणि 3 सिक्स मारले. यादरम्यान पाचव्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर लगावलेला त्याचा सिक्स खूप चर्चेत आहे. त्या ओव्हरमध्ये रोहितने नवीन-उल-हकच्या चेंडूवर असा सिक्स मारला की, चेंडू बाऊंड्री ओलांडून डगआऊटमध्ये बसलेल्या कर्णधार विराट कोहलीकडे जाऊन पोहोचला. अशा स्थितीत विराट कोहलीने तो चेंडू झेलला आणि अफगाणिस्तान संघाला परत केला.
भारतीय संघाच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्माची बॅट खूपच शांत होती. पाकिस्तानविरुद्ध शून्यावरच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर उतरत त्याने 14 धावांचं योगदान दिलं होतं. मात्र अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात उत्तम खेळी करत त्याने सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे.
सेमीफायनल गाठू शकते टीम इंडिया?
नेट-रन रेट प्लसमध्ये आणण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला 63 किंवा त्याहून अधिक धावांनी पराभूत करावं लागलं होतं. दरम्यान टीम इंडियाने तेच केलं आहे. यासह नेट-रनरेट +0.073 वर पोहोचला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग अजूनही शिल्लक आहे. मात्र त्यांना त्यांचे आगामी दोन सामनेही मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.
मात्र, यामुळे टीम इंडियाचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होणार नाही. त्यासाठी अफगाणिस्तानलाही न्यूझीलंडला हरवावं लागणार आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर विजय मिळवला, तर नामिबियाच्या सामन्यात भारताला सर्व कॅल्कुलेशन करायची वेळ येईल.