मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १३७ रननी विजय झाला. या विजयाबरोबरच भारतानं २०१८ या वर्षाचा शेवट गोड केला. भारतीय टीमचा खेळाडू रोहित शर्माच्या वैयक्तिक आयुष्यातही या वर्षाचा शेवट गोड झाला आहे. रोहित शर्माची पत्नी रितीका सचदेवनं मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्माची बातमी कळताच रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाहून मुंबईला रवाना झाला आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट खेळू शकणार नाही. ३ जानेवारीपासून या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा भारतात परत येत असला तरी तो ८ जानेवारीला पुन्हा ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. १२ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. या वनडे सीरिजसाठी रोहित उपलब्ध आहे, असं बीसीसीआयनं सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौथ्या टेस्टला रोहित मुकणार असला तरी भारतीय टीमनं अजून रोहितच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. मेलबर्नमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये रोहित शर्मानं अर्धशतक केलं होतं.


रोहित शर्माच्याऐवजी चौथ्या टेस्टसाठी भारतीय टीम हार्दिक पांड्या किंवा २ स्पिनर घेऊन मैदानात उतरू शकते. पण दोन स्पिनर खेळवण्याचा निर्णय सिडनीतली खेळपट्टी बघून घेतला जाईल. पण सिडनीमधली खेळपट्टी भारतीय स्पिनरना मदत करण्याची शक्यता असल्याचं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेननं बोलून दाखवलं.


पर्थमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं एकही स्पिनर खेळवला नव्हता. या मॅचमध्ये भारतीय टीमचा पराभव झाला. त्यामुळे टीम निवडीवर टीका करण्यात आली. यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं डावखुरा स्पिनर रवींद्र जडेजाची निवड केली. ऑफ स्पिनर आर.अश्विनला दुखापत झाल्यामुळे तो दोन टेस्ट मॅच खेळू शकला नाही. चौथ्या टेस्टसाठी अश्विन फिट झाला तर रोहितऐवजी त्याला संधी दिली जाऊ शकते. अश्विनला संधी मिळाली तर भारत ५ बॉलर घेऊन मैदानात उतरेल. चौथ्या टेस्टसाठी कर्णधार विराट कोहलीकडे चायनामन बॉलर कुलदीप यादवचा पर्यायही उपलब्ध आहे. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्मा खेळला होता. पण पाठीच्या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या टेस्टला मुकावं लागलं होतं.


हनुमा विहारी पुन्हा मधल्या फळीत?


तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं वारंवार अपयशी ठरत असलेल्या मुरली विजय आणि केएल राहुल यांना डच्चू दिला होता. या दोघांऐवजी मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारीला संधी दिली. मयंक अग्रवालनं या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक केलं. तर हनुमा विहारीनं पहिल्या इनिंगमध्ये ६६ बॉलमध्ये ८ रनची खेळी केली आणि दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं ४५ बॉलमध्ये १३ रन केले. विहारीनं मयंकला चांगली साथ दिली असली तरी बाऊन्सर बॉलिंगवर विहारीला अडचणींचा सामना करावा लागला.


उसळणाऱ्या बॉलवर हनुमा विहारीचं तंत्र बघता त्याला पुन्हा एकदा मधल्या फळीत खेळवलं जाऊ शकतं. जर असा निर्णय घेतला तर भारताला केएल राहुल किंवा मुरली विजय यांच्यापैकी एकाला ओपनर म्हणून टीममध्ये घ्यावं लागेल. राहुल आणि विजयनं मागच्या ८ इनिंगमध्ये एकत्र फक्त ९७ रन केल्या आहेत. टेस्ट सीरिज सुरु होण्याआधी सराव सामन्यामध्ये भारताचा ओपनर पृथ्वी शॉला दुखापत झाली, त्यामुळे तो संपूर्ण सीरिज खेळू शकला नाही.