स्वस्तात आऊट होऊनही रोहितचा विश्वविक्रम, एबी डिव्हिलियर्स-गेलला मागे टाकलं
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्माला संधी देण्यात आली.
ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्माला संधी देण्यात आली. वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये अपयशी ठरल्यामुळे रोहितला त्याची टेस्ट टीममधली जागा गमवावी लागली होती. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमनाच्या मॅचमध्येही रोहितला चमकदार कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा ६१ बॉलमध्ये ३७ रन करून आऊट झाला. स्वस्तात आऊट झाल्यानंतरही रोहित शर्मानं विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आपल्या ३७ रनच्या खेळीमध्ये रोहितनं ३ सिक्स आणि २ फोर मारल्या.
इनिंगमधल्या ३ सिक्सबरोबरच रोहितनं २०१८ मध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एका वर्षात सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. २०१७ साली रोहितनं ६५ सिक्स लगावल्या होत्या. हे सलग दुसरं वर्ष आहे जेव्हा रोहितनं हे रेकॉर्ड केलं आहे. २०१८ या वर्षामध्ये रोहित शर्मानं ७४ सिक्स लगावल्या आहेत. एका वर्षात एवढ्या सिक्स याआधी कोणत्याच खेळाडूला मारता आल्या नव्हत्या.
एका वर्षात सर्वाधिक सिक्सचं रेकॉर्ड
खेळाडू | सिक्स | वर्ष |
रोहित शर्मा | ७४ | २०१८ |
रोहित शर्मा | ६५ | २०१७ |
एबी डिव्हिलियर्स | ६३ | २०१५ |
शेन वॉटसन | ५७ | २०११ |
पहिल्या दिवसाचा लंच होईपर्यंत भारताची अवस्था ४ आऊट ५६ अशी झाली होती. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय बॅटिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे गडगडली. केएल राहुल (२ रन), मुरली विजय (११ रन), कर्णधार विराट कोहली (३ रन) आणि अजिंक्य रहाणे (१३ रन) आऊट झाले. पण चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मामध्ये ४५ रनची पार्टनरशीप केली.
बेजबाबदार शॉट मारून रोहित आऊट
रोहित शर्मा मोठ्या स्कोअरकडे वाटचाल करणार असं वाटत असतानाच बेजबाबदार शॉट मारून आऊट झाला. ३७व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला रोहतिनं नॅथन लायनला सिक्स मारली. बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या मार्कस हॅरिसनं चांगली फिल्डिंग केली. हॅरिसनं सिक्स वाचवल्याच सुरुवातीला वाटलं, पण ऍक्शन रिप्ले बघितल्यानंतर ती सिक्सच असल्याचं दिसलं. यानंतर पुढच्याच बॉलवर पुन्हा एकदा रोहितनं सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र मार्कस हॅरिसनं कोणतीही चूक केली नाही आणि रोहितचा कॅच पकडला. रोहित आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोअर ८६/५ असा होता.