Rohit Sharma Blunt Message To Rishabh Pant: भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऋषभ पंतसंदर्भात बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. ऋषभ पंतला आता हे समजायला हवं की त्याच्याकडून काय अपेक्षित आहे, अशी अपेक्षा रोहितने व्यक्त केली आहे. सोमवारी मेलबर्नमधील कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा बोलत होता. पंतने या सामन्यामध्ये 104 बॉलमध्ये 30 धावा केल्या. दुसऱ्या सत्राच्या ब्रेकदरम्यान पंत आणि यशस्वी जयस्वाल हे दोघे भारताला आक्रमक खेळ करुन विजयाच्या जवळ नेतील असं वाटत असतानाच पंतची विकेट पडली आणि भारतीय संघाच्या फलंदाजीला गळती लागली. पंतच्या विकेटनंतर ठराविक अंतराने भारतीय संघाच्या विकेट्स पडत राहिल्या. याच सामन्याबद्दल बोलताना रोहितने पंतच्या खेळीवर नाराजी व्यक्त केली आहे. पंतने धोका पत्कारण्याची शक्यता किती आहे याची चाचपणी केली पाहिजे, असं रोहित म्हणाला आहे.


अनेकदा यश मिळवून दिलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतबद्दल बोलताना, "त्याच्याकडून काय अपेक्षित आहे हे त्याला समजलं पाहिजे. आम्ही त्याला सांगण्यापेक्षा त्यानेच समजून घेणं आणि शोधून काढणं गरजेचं आहे की यामधून योग्यपद्धतीने मार्ग कसा काढता येईल हे पाहिलं पाहिजे. पूर्वी त्याने त्याच्या खेळींच्या माध्यमातून आम्हाला अनेकदा यश मिळवून दिलं आहे. कर्णधार म्हणून त्याच्या एकंदरित खेळीबद्दल माझी प्रतिक्रिया संमिश्र आहे," असं रोहितने सामन्यानंतर मत व्यक्त करत म्हटलं.


त्यानेच ठरवलं पाहिजे


"काही वेळेस तो ज्या पद्धतीच्या शैलीसाठी ओळखला जातो त्याच पद्धतीने त्याने खेळावं यासाठी तुम्ही त्याला पाठिंबा देता. मात्र कधीतरी तो खेळतो तसा आक्रमक खेळ योग्य वाटत नाही. हे सर्वांसाठीच फार संतापजनक असतं. जे आहे ते आहे. आपण सत्य नाकारु शकत नाही. यश असो किंवा अपयश ते बॅलेन्स झालं पाहिजे. त्याच्या अशा खेळीने त्याला यापूर्वी अनेकदा यश मिळवून दिलं असल्याने याबद्दल कर्णधार म्हणून त्याच्याशी बोलणं हे फार कठीण वाटतं. मात्र यातून योग्य पद्धतीने मार्ग कसा काढला पाहिजे हे त्याचं त्याने ठरवायला हवं. हे परिस्थितीवरही अवलंबून असतं. सामन्यातील काही प्रसंगांमध्ये धोका पत्कारण्याची टक्केवारी किती असते हे पाहून ती घ्यायची की नाही हे ठरवावं लागतं ना? विरोधी संघाने सामन्यात पुनरागमन करावं असं वाटतं का? या गोष्टी त्याच्या त्याने शोधून काढल्या पाहिजेत," असं रोहित शर्मा म्हणाला.


आधीही केली आहे चर्चा


आपण यापूर्वी पंतबरोबर त्याच्या फलंदाजीसंदर्भात चर्चा केल्याची कबुली रोहित शर्माने दिली. मात्र त्याचवेळी त्याने या अशा खेळीच्या माध्यमातून बरेच यश मिळवल्याने याबद्दल बोलावं कसं अशी गोची होत असल्याचं रोहितने प्रांजळपणे मान्य केलं.