माऊंट मॉनगनुई : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटनी दणदणीत विजय झाला. याचबरोबर ५ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं ३-०ची विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडनं ठेवलेल्या २४४ रनचा पाठलाग करताना रोहित शर्मानं ७७ बॉलमध्ये सर्वाधिक ६२ रनची खेळी केली. या मॅचमध्ये रोहित शर्मानं २ सिक्स मारले. यातल्या दुसऱ्या सिक्सनंतर रोहितनं धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रोहित आणि धोनी हे आता भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे खेळाडू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीनं आत्तापर्यंत ३३७ वनडे मॅचमध्ये २२२ सिक्स मारल्या आहेत. यातल्या ७ सिक्स त्यानं आशिया-११ कडून खेळताना मारल्या. म्हणजेच भारताकडून खेळताना धोनीच्या खात्या २१५ सिक्सचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहितनं लॉकी फर्ग्युसनच्या बॉलिंगवर मिड विकेटला सिक्स मारत धोनीच्या २१५ सिक्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. दुखापत झाल्यामुळे धोनी तिसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता.


चौथ्या आणि पाचव्या सामन्यामध्ये रोहित आणि धोनीला त्यांच्या सिक्स वाढवण्याची संधी आहे. चौथी वनडे ३१ जानेवारी आणि पाचवी वनडे ३ फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. 


भारताकडून सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर १९५ सिक्ससह तिसऱ्या क्रमांकावर, सौरव गांगुली १८९ सिक्ससह चौथ्या क्रमांकावर आणि १५३ सिक्ससह युवराज सिंग पाचव्या क्रमांकावर आहे.


न्यूझीलंडविरुद्धच्या या मॅचमध्ये रोहित शर्मानं आणखी एक रेकॉर्ड त्याच्या नावावर केला. लिस्ट ए (मर्यादित ओव्हर) कारकिर्दीत रोहित शर्मानं १० हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. हे रेकॉर्ड करणारा रोहित हा १०वा भारतीय खेळाडू आहे. रोहितनं हे रेकॉर्ड २६० इनिंगमध्ये केलं. एवढ्या कमी इनिंगमध्ये हे रेकॉर्ड करणारा रोहित हा चौथा भारतीय आहे. विराटनं २१९ इनिंगमध्ये, सौरव गांगुलीनं २५२ इनिंगमध्ये आणि सचिन तेंडुलकरनं २५७ इनिंगमध्ये १० हजार रनचा टप्पा गाठला होता.