SAvsIND: आफ्रिकेत `हे` दोन बॉलर्स ठरले रोहित शर्मासाठी डोकेदुखी
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात आफ्रिकन टीमला पराभूत करत टीम इंडियाने दोन सीरिज आपल्या नावावर केल्या आहेत. मात्र, या सीरिजमध्ये टीम इंडियाच्या रोहित शर्माला चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याचं दिसत आहे.
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात आफ्रिकन टीमला पराभूत करत टीम इंडियाने दोन सीरिज आपल्या नावावर केल्या आहेत. मात्र, या सीरिजमध्ये टीम इंडियाच्या रोहित शर्माला चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याचं दिसत आहे.
रोहित शर्मासाठी वाईट स्वप्न
वन-डे मध्ये तीन-तीन डबल सेंच्युरी करणाऱ्या रोहित शर्माला टीम इंडियात जागा देण्यात आली. मात्र, ३ मॅचेसची टेस्ट सीरिज रोहित शर्मासाठी वाईट स्वप्न ठरलं आहे.
टेस्ट सीरिजमध्ये रोहितने ४ इनिंग्स खेळत केवळ ७८ रन्स केले. रोहित शर्मा पेक्षा जास्त रन्स भुवनेश्वर कुमारने केले. भुवनेश्वर कुमारने ४ इनिंग्समध्ये १०१ रन्स केले.
रोहित शर्मा फ्लॉप ठरला
टेस्टनंतर वन-डे सीरिजचं बोलायचं झालं तर, वन-डे आणि टी-२० मध्येही रोहित शर्मा फ्लॉप ठरला. केवळ एका वन-डे मॅचमध्ये रोहितने चांगली इनिंग खेळली. आफ्रिकेच्या या दौऱ्यात दोन बॉलर्सने रोहितला चांगलचं त्रस्त केलं आणि त्यामुळे रोहित शर्मा फ्लॉप ठरला.
टेस्ट आणि वन-डे मध्ये रबाडा बनला डोकेदुखी
आफ्रिकेच्या मैदानात रोहित शर्माला टेस्ट आणि वन-डे सीरिजमध्ये फास्ट बॉलर रबाडाने भेदक गोलंदाजीच्या जोरावर रोहितला रोखलं. तर, टी-२० सीरिजमध्ये ज्युनिअर डाला या नव्या बॉलरने रोहितला रोखलं. टेस्ट मॅचेसच्या ४ इनिंग्समध्ये ३ वेळा रोहित शर्माला रबाडाने आऊट केलं तर एकदा वेर्नोन फिलेंडरने आऊट केलं.
वन-डे इनिंग्समध्ये रोहितला रबाडाने आपल्या बॉलिंगने गोंधळात टाकलं. ६ मॅचेसमध्ये ३ वेळा रबाडाने रोहितची विकेट घेतली. दोन वेळा एंगिडीने तर एकदा मोर्कलने विकेट घेतली.
३ टी-२० मॅचेसमध्ये केवळ ३२ रन्स
टी-२० मध्येही रोहित शर्माचा फॉर्म परत आला नाही. ३ मॅचेसच्या सीरिजमध्ये रोहितला तिन्ही वेळा ज्युनिअर डालाने आऊट केलं. रोहितने ३ मॅचेसमध्ये केवळ ३२ रन्स केले.