मुंबई : विराट कोहलीकडून वनडेचं कर्णधारपद हिरावून रोहित शर्माकडे देण्याचा बीसीसीआयचा निर्णय सतत चर्चेत आहे. टी-20 वर्ल्डकपनंतर रोहितला या फॉरमॅटचा नवा कर्णधार बनवल्यानंतर बीसीसीआयने बुधवारी अचानक वनडे संघाचं कर्णधारपद रोहितकडे सोपवले. दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये असं म्हटलं जात आहे की, टी-20 चे कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहितने निवड समितीसमोर एक अट ठेवली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अट अशी की, वनडे संघाचे कर्णधारपद मिळाल्यासच तो कर्णधारपद स्वीकारेल. कोहलीने टी-20 वर्ल्डकपपूर्वी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. यानंतर बीसीसीआयने आता कोहलीला कर्णधारपद सोडण्याची इच्छा नसतानाही त्याला वनडे कर्णधारपदावरून हटवलं आहे.


क्रिकबझच्या वृत्तानुसार, कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवण्याची बैठक झाली तेव्हा रोहितला याबाबत काहीही माहिती नव्हती. रोहित मुंबईतच केएल राहुल, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांच्यासोबत फलंदाजीचा सराव करत होता. मात्र, रोहित शर्माने याआधीच निवड समितीसमोर वनडे कर्णधारपदाची इच्छा व्यक्त केली होती.



कर्णधार रोहितचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये, रोहितने आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलं आहे, ज्यापैकी भारताने आठ जिंकले आहेत आणि दोन सामने गमावले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहितची विजयाची टक्केवारी 80.00 आहे.


रोहितने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 22 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केलं आहे, यामध्ये त्याने 18 जिंकले आणि चार गमावले. तसंच, रोहितने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले असून विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने नेहमीच संघाची धुरा सांभाळली आहे.