Rohit Sharma : तिच्यासाठी मी यंदाची आयपीएल जिंकणार...; खुद्द रोहितने दिला शब्द
रितीकाशी बोलताना रोहितने मान्य केलं की, तो शेवटच्या ओव्हरला इतका घाबरला होता की तो ओव्हर न पाहता आतील बाजूला जाऊन बसला होता.
Rohit Sharma : कालचा दिवस मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंसाठी आणि चाहत्यांसाठी आनंदाचा दिवस होता. दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या (Delhi Capitals) सामन्यातमुंबई इंडियन्सने यंदाच्या सिझनमधील पहिला विजय नोंदवला. मुंबईने 6 विकेट्सने दिल्लीचा (Mumbai Indians Beat Delhi Capitals) पराभव केला. दरम्यान या पहिल्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा खूप आनंदात दिसून आला. तर सामन्यानंतर तो पत्नी रितीकाशी (Ritika Sajdeh) व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. रोहित शर्माने स्वतः रितीकासोबत सुरु असलेला व्हिडीओ कॉल कॅमेरावर दाखवला. यावेळी रितीकाशी बोलताना रोहितने मान्य केलं की, तो शेवटच्या ओव्हरला इतका घाबरला होता की तो ओव्हर न पाहता आतील बाजूला जाऊन बसला होता.
या व्यक्तीसाठी जिंकणार आयपीएलचा खिताब
मुंबई इंडियन्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित त्याच्या पत्नीशी बोलताना, त्यांची मुलगी समायरासाठी यंदाचा आयपीएलचा खिताब जिंकणार असल्याचं सांगतो.
रितीका म्हणते की, तुझं खूप अभिनंदन. समायरा ट्रॉफी पाहून खूप खूश होईल. यावर रोहित म्हणाला, मी तिच्यासाठी नक्की ट्रॉफी घेऊन येणार आहे.
यादरम्यान रोहितने रितीकाला, तू सामना कुठे पाहतेयस असा प्रश्न केला असता, ती म्हणाली, आपल्या रूममध्ये बसून मी सामना पाहिला. त्यावेळी मी खूप जोरजोरात ओरडत होती. त्यामुळे माझा आवाज आता बसलाय. सामना खूप रोमांचक होता.
रितीकाशी बोलताना रोहित पुढे म्हणाला, मलाही फार आनंद झाला आहे. मात्र मी शेवटची ओव्हर पाहिली नाही, मी आत जाऊन बसलो होतो. आयपीएलच्या 15 वर्षांमध्ये असे सामने मी पाहिलेत, मी तुम्हाला मिस करतोय.
दिल्लीविरूद्ध रोहितची तुफान खेळी
मंगळवारी दिल्ली विरूद्ध मुंबईच्या सामन्यात रोहित शर्माने तुफान फलंदाजी केली. 45 बॉल्समध्ये हिटमॅनने 65 रन्सची खेळी केली. यामध्ये 4 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. अखेर या सामन्यात विजय मिळवत मुंबईच्या टीमने यंदाच्या सिझनमध्ये विजयाचं खातं उघडलं. गेल्या काही दिवसांपासून रोहितवर टीका करण्यात येत होती. अखेर रोहित शर्माची बॅट तळपली. रोहितच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर मुंबईला पहिल्या विजयाची नोंद करण्यात यश आलं आहे.