कोलकाता विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने आपल्या नावे केले हे रेकॉर्ड
रोहित शर्माच्या फलंदाजीने पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकलं.
अबुधाबी : आयपीएल 2020 च्या पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या फलंदाजीने पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकलं. अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने कोलकाताच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. आयपीएल कारकिर्दीतील 37 वे अर्धशतक त्याने झळकावले. रोहित शर्माने 54 बॉलमध्ये 3 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीने 80 रनची खेळी केली.
केकेआर विरुद्धच्या या डावात रोहितने अनेक खास विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रोहित शर्माने आयपीएल कारकीर्दीत २०० सिक्स ही पूर्ण केले. या सामन्यात त्याने सहावा षटकार ठोकताच त्याचा २०० सिक्स मारण्याचा विक्रम पूर्ण झाला आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात २०० सिक्स ठोकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहितशिवाय केवळ एसएस धोनीने भारतीय खेळाडूंमध्ये हा विक्रम केला आहे. त्याचबरोबर ख्रिस गेलने आतापर्यंत 326 सिक्स मारले आहेत.
तसेच कोणत्याही एका संघाविरूद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहितने सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. डेव्हिड वॉर्नरचा हा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध होता.