वनडे क्रमवारीमध्ये रोहित शर्माची पाचव्या क्रमांकावर उडी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच वनडे मॅचच्या सीरिजमध्ये चांगली कामगिरी केलेल्या रोहित शर्मानं आयसीसीच्या वनडे बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर उडी घेतली आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच वनडे मॅचच्या सीरिजमध्ये चांगली कामगिरी केलेल्या रोहित शर्मानं आयसीसीच्या वनडे बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू होता.
या सीरिजमध्ये रोहितनं २९६ रन्स केल्या. पाचव्या वनडेमध्ये रोहितनं १२५ रन्स करून भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं. सध्या पाचव्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्माची सर्वोत्तम क्रमवारी तिसऱ्या क्रमांकावर होती. २०१६मध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता.
पाच मॅचच्या या सीरिजमध्ये लागोपाठ चार अर्धशतकं झळकावणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीमध्येही सुधारणा झाली आहे. अजिंक्यनं चार क्रमवारीची उडी घेऊन तो आता २४ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
वनडे क्रमवारीमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहली पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर बॉलर्सच्या क्रमवारीमध्ये जसप्रीत बुमराह पाचव्या, अक्सर पटेल आठव्या आणि भुवनेश्वर कुमार चौदाव्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये हार्दिक पांड्या पंधराव्या आणि रवींद्र जडेजा १९व्या क्रमांकावर आहे. भारतीय टीम वनडेमध्ये अव्वल क्रमांकावर कायम आहे.