नवी दिल्ली : यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी टीम इंडियाचा 'हिटमॅन' रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली गेली. देशातील खेळाडूंना दिला जाणारा हा सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार आहे. रोहितसह महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि  पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता मारियाप्पन थंगावेलू यांच्या ही नावाची शिफारस करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शिफारसीनंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची मंजुरी अद्याप मिळालेली नाही. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद निवडलेल्या खेळाडूला पुरस्कार देतील. रोहित शर्माच्या आधी सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला होता.



2019 हे वर्ष रोहित शर्मासाठी चांगले ठरले आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी त्याने वनडे क्रिकेटमध्ये  1,490 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने वर्ल्डकपमध्ये आपल्या शानदार फलंदाजीने प्रत्येकाचे मन जिंकले. यामध्ये त्याने ५ शतके ठोकली, जो एक विक्रमही ठरला आहे.



29 ऑगस्ट 2020 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, राष्ट्रपती हे क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडुला हा पुरस्कार देऊन सन्मानित करतील. या दिवशी खेळाडूंना अर्जुन पुरस्कार आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात येतो. याशिवाय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाला द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केले जाते.