IPL 2022: मुंबईत सामने खेळवण्याचा फायदा..., रोहित शर्माचं मोठं वक्तव्य
आयपीएलच्या सामन्यापूर्वी रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे.
मुंबई : उद्यापासून आयपीएलच्या 15 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. चेन्नईप्रमाणेच चाहत्यांना दुसऱ्या म्हणजेच मुंबई विरूद्ध दिल्लीच्या सामन्याची उत्सुकता आहे. रविवारी हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद झाली. यावेळी रोहितने मुंबईमध्ये सामने खेळवण्याचा आम्हाला जास्त फायदा होणार नसल्याचं सांगितलंय.
रोहित म्हणाला की, मला आशा आहे की तुम्ही लिलाव पाहिला असेल. अनेक नवीन खेळाडू टीममध्ये आले आहेत. टीममधीतील 70 किंवा 80 टक्के खेळाडू यापूर्वी मुंबईत खेळलेले नाहीत. त्यामुळे अतिरिक्त फायदा होईल असं काही नाही.
रोहित शर्मा पुढे म्हणाला की, फक्त मी, सूर्यकुमार, पोलार्ड, इशान किशन, जसप्रीत बुमराह यांनी मुंबईत अनेक सामने खेळले आहेत. इतर खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याचा अनुभव नाहीये.
दरम्यान यावेळी मुंबई इंडियन्स सोडून केलेल्या हार्दिक पंड्याला आणि त्याच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. हार्दिक पंड्या आता गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे.
रोहित शर्मा म्हणाला, हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्ससाठी जे योगदान दिलं आहे, ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. त्याने आमच्या टीमसाठी नेहमी चांगला खेळ केला आहे. आता तो एका दुसऱ्या टीमचा कर्धणार आहे, यावेळी माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत.