टेस्ट टीममध्ये निवड नाही, रोहित शर्मा म्हणतो...
भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील टी-२० आणि वनडे सीरिज आता संपली आहे.
मुंबई : भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील टी-२० आणि वनडे सीरिज आता संपली आहे. या सीरिजनंतर टेस्ट मॅचसाठीच्या टीमची घोषणा झाली आहे. या टीममध्ये पहिल्या वनडेत शतक करणाऱ्या रोहित शर्माला जागा देण्यात आलेली नाही. या सीरिजच्या शेवटच्या टी-२० मध्ये आणि पहिल्या वनडेमध्ये रोहितनं शतक केलं होतं. वनडेमध्ये तीन द्विशतकं, पहिल्या दोन टेस्टमध्ये शानदार शतक, वनडेमध्ये २६४ रनचा सर्वाधिक स्कोअर असे अनेक विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहेत. पण तरीही रोहित शर्माला टेस्ट क्रिकेटमध्ये स्वत:चं स्थान निश्चित करता आलेलं नाही.
अफगाणिस्तानविरुद्धची एकमेव टेस्ट आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टेस्टमध्येही रोहितला संधी देण्यात आलेली नव्हती. रोहितनं आत्तापर्यंत २५ टेस्टच्या ४३ इनिंगमध्ये ३९.९७ च्या सरासरीनं १,४७९ रन केल्या. यामध्ये ३ शतकं आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन टेस्ट मॅचमध्ये रोहितनं ११, १०, १० आणि ४७ रन केल्या होत्या. टेस्ट क्रिकेटमध्ये सातत्य नसल्यामुळेच रोहितला टेस्ट टीममध्ये संधी मिळत नसल्याचं बोललं जात आहे.
रोहितचं ट्विट
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये निवड न झाल्यानंतर रोहित शर्मानं ट्विट केलं आहे. सूर्य पुन्हा उगवेल, असं मार्मिक ट्विट रोहित शर्मानं केलं आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठी निवड न झाल्यानंतरही रोहितनं एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली होती. आता मी कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर पोहोचलो आहे, जिकडे टेस्ट क्रिकेटचा विचार करणं सोडून दिलं आहे, असं रोहित म्हणाला आहे.