नवी दिल्ली : भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर रोहित शर्माने आपलं मतं व्यक्त केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंका दौ-यात होणा-या पाच वन-डे मॅचेससाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीमचा कर्णधार विराट कोहली असणार आहे तर उपकर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे.


उपकर्णधारपदी निवड झाल्यानंतर रोहित शर्माने प्रसारमाध्यमांसोबत बोलताना म्हटलं की, भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी झालेली निवड हा माझ्यासाठी मोठा गौरवच आहे. दहा वर्षांपूर्वी मी केवळ टीम इंडियासाठी खेळण्याचा विचार करत होतो. मात्र, आता उपकर्णधारपदी निवड झाल्याने एक वेगळाच आनंद होत आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी सज्ज आहे. 


उपकर्णधार म्हणून पहिल्यांदाच मैदानात उतरणा-या रोहित शर्माने म्हटलं की, टीमसाठी खेळणं आणि टीमसाठी इतरही कामं करण्याची ही वेळ आहे. उपकर्णधारपदाची ही जबाबदारी मी एन्जॉय करेल. 


रोहीत शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार होता. मात्र, मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि टीम इंडियाचं उपकर्णधार या दोन्हीमध्ये खुप फरक असल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचेस या दोघांत खूप फरक आहे मात्र, उत्साह आणि आनंद तसाच असतो असेही रोहित शर्माने म्हटलं आहे. 


भारत आणि श्रीलंका यांच्यात २० ऑगस्टपासून पाच वन-डे आणि एक टी-२० मॅचेस खेळल्या जाणार आहेत. या दौ-यासाठी टीम इंडियातील काही खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. रोहित शर्मा आणि बुमराह यासारख्या खेळाडूंना टीममध्ये जागा मिळवली आहे. तसेच पहिल्यांदाच रोहित शर्माला टीम इंडियाचं उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.