`देश पहिले, बाकीचं नंतर`, आयपीएलच्या प्रश्नावर रोहितचं उत्तर
जगभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे प्रचंड जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे.
मुंबई : जगभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे प्रचंड जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. पंतप्रधानांनी घोषणा करण्याच्या आधीच बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. १५ एप्रिलपर्यंत आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. पण सध्यातरी यंदाची आयपीएल होणं कठीण दिसत आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना देश पहिले, बाकीचं नंतर अशी प्रतिक्रिया दिली. रोहितने लेग स्पिनर युझवेंद्र चहलसोबत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी चहलने रोहितला आयपीएल कधी होईल? असा प्रश्न विचारला.
'सध्या अनेक जण आयपीएलबद्दलच बोलत आहेत. पण खेळायची ही योग्य वेळ नाही. आपल्याला पहिले सध्याची परिस्थिती आणि देशाबद्दल विचार केला पाहिजे. परिस्थिती नीट झाली की आयपीएलबद्दल बोलू,' असं रोहित म्हणाला.
युझवेंद्र चहलशी बोलण्याआधी रोहित शर्माने इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनसोबतही व्हिडिओ कॉलवर चर्चा केली. कोरोना व्हायरसवर नियंत्रण कधी मिळेल, यावर आयपीएलचं भवितव्य अवलंबून आहे. कोरोनाचा धोका संपल्यानंतर परिस्थिती सामान्य झाल्यावर आयपीएल खेळवली जाऊ शकते, असं रोहितने पीटरसनशी बोलताना सांगितलं.