मुंबईतील हवेचा दर्जा घसरलेला असून, गेल्या काही दिवसांतील आकडेवारी भुवया उंचावणारी आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता इतकी खराब आहे की, सध्या दिल्लीपेक्षाही वाईट स्थिती आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक चिंता व्यक्त करत असतानाच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही यावर भाष्य केलं आहे. रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करत मुंबईत नेमकं काय सुरु आहे अशी विचारणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील स्थिती किती वाईट आहे हे दर्शवणारा एक फोटो रोहित शर्माने इंस्टाग्रामला शेअर केला आहे. रोहित शर्माने विमानातून हा फोटो काढला असून, त्यात मुंबईवर खराब हवेची चादर दिसत आहे. हवेमुळे मुंबई स्पष्टही दिसत नाही आहे. हा फोटो शेअर करताना रोहितने लिहिलं आहे की, 'मुंबई, हे काय झालं आहे'. 


भारतीय संघ वर्ल्डकपमधील पुढील सामन्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. वानखेडे मैदानात भारतीय संघ श्रीलंकेशी भिडणार आहे. या प्रवासादरम्यान रोहित शर्माने हा फोटो काढला आहे. हा फोटो शेअर करताना रोहित शर्माने मास्क घातलेला इमोजी शेअर केला आहे. 



CPCB नुसार, मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) मंगळवारी सकाळी 161 वर आहे, जो 'मध्यम' श्रेणीत येतो. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सर्वात खराब हवेची गुणवत्ता नोंदवली गेली आहे. तिछे हवेची गुणवत्ता 257 वर पोहोचली आहे. यानंतर सायन (218), वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी (198) आणि कुलाब्यातील नेव्ही नगर (189) आहेत.


AQI नुसार, 0 आणि 50 मधील हवेची गुणवत्ता ही "चांगली" मानली जाते. तर 51 आणि 100 'समाधानकारक', 101 आणि 200 'मध्यम', 201 आणि 300 'खराब', 301 आणि 400 'अतिशय खराब" मानली जाते. तसंच 401 आणि 450 किंवा त्याहून अधिक असल्यास ही फार गंभीर स्थिती आहे.  


मुंबईच्या विलेपार्ले येथे काही आठवड्यांपूर्वीच AQI ने गंभीर श्रेणी ओलांडली होती. तर शहरातील सर्वात व्यस्त भागांपैकी एक असणाऱ्या अंधेरीत 17 ऑक्टोबर रोजी AQI 347 नोंदवला गेला.


जो रुटनेही केलं होतं भाष्य


मुंबईतील हवामानावर भाष्य करणारा रोहित पहिलाच खेळाडू नाही. याआधी जो रुट याने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या खेळाडूंना खेळादरम्यान किती तीव्र उष्णता आणि आर्द्रतेचा सामना करावा लागला, याचा उल्लेख केला होता. "मी याआधी कधीच अशा वातावरणात खेळलेलो नाही. मी नक्कीच यापेक्षा तीव्र उष्णता आणि आर्द्रता असणाऱ्या ठिकाणी खेळलो आहे. पण येथे मला जणू काही श्वास घेण्यास त्रास होत आहे असं वाटत होतं. जणू काही तुम्ही हवाच खात आहात. हे वेगळं होतं. तुम्ही हेन्रिरकडे पाहूनही हा अनुभव घेऊ शकता. तो पुन्हा मैदानावर परत येऊच शकला नाही," असं जो रुटने सांगितलं. 


जो रुटने यावेळी आदिल रशीद गोलंदाजी करताना आवाज काढत होता सांगता, त्याला श्वास घेताना त्रास जाणवत असल्याचा दावा केला. 32 वर्षीय खेळाडू पुढे म्हणाला की, खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताच त्यांची जर्सी पूर्णपणे भिजली होती. तो पुढे म्हणाला की रशीदला खेळादरम्यान गोलंदाजी करणं खरोखर कठीण असल्याचं दिसून आले. 


"तुम्ही हे टाळू शकत नाही. तुम्ही मैदानात येता तेव्हात तुमचं टी-शर्ट भिजलेलं असत. तुमचा श्वासही जड झालेला असतो. तुमचा फिटनेस आणि इतर गोष्टी तुम्हाला माहिती असतात. त्यामुळे तुम्हाला याची कल्पना असते," असं जो रुट म्हणाला.