मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचआधी भारतीय टीम संकटात सापडली आहे. सरावादरम्यान रोहित शर्माच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. दुखापत झाल्यानंतर फिजिओकडून उपचार घेऊन रोहितने सराव सुरुच ठेवला. रोहितच्या दुखापतीवर बीसीसीआयकडून अजून स्पष्टीकरण आलेलं नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली वनडे १४ जानेवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी केलेला थ्रो रोहित शर्माच्या अंगठ्याला लागल्याची माहिती आहे. बीसीसीआयने रोहितच्या दुखापतीबाबत काही सांगितलं नसलं तरी फिजिओ रोहितच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत.


भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ३ वनडे मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. १४ तारखेच्या मॅचनंतर राजकोटमध्ये १७ जानेवारीला दुसरी आणि १९ जानेवारीला बंगळुरूमध्ये तिसरी वनडे खेळवण्यात येणार आहे.


वनडे क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही टीम मागच्यावर्षी वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचल्या होत्या. पण ऑस्ट्रेलियाला इंग्लंडने आणि टीम इंडियाला न्यूझीलंडने पराभूत केलं होतं. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया भारतात वनडे सीरिज खेळण्यासाठी आली होती. तेव्हा पहिल्या २ मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता, पण शेवटच्या ३ मॅच जिंकून ऑस्ट्रेलियाने सीरिज खिशात टाकली होती.


मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये दोन्ही टीममध्ये आतापर्यंत ३ वेळा मॅच झाल्या आहेत. यातल्या पहिल्या दोन मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा तर शेवटच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. ऑस्ट्रेलियाने १९९६ आणि २००३ साली मुंबईत भारताचा पराभव केला, तर २००७ साली या मैदानात भारताने ऑस्ट्रेलियाला नमवलं होतं.