मुंबईच्या निराशाजनक कामगिरीनंतर रोहितची पहिली प्रतिक्रिया
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली.
मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली. यावर्षी प्ले ऑफमध्येही मुंबईला प्रवेश मिळवता आला नाही. १४ मॅचमध्ये ८ पराभव आणि ६ विजयाबरोबर मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर राहिली. या कामगिरीनंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं चाहत्यांसाठी ट्विट केलं आहे. स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे निराश आहे. आयुष्य आणि खेळ असाच असतो. प्रत्येक वेळी आपल्याला जे पाहिजे ते मिळतंच असं नाही. आम्ही जिद्दीनं लढा दिला पण विरुद्ध टीम आमच्यापेक्षा चांगल्या खेळल्या. पुढच्या वर्षी उलटफेर करण्याचा प्रयत्न आम्ही करू असं रोहित म्हणाला आहे.
रोहितच्या खराब कामगिरीचा मुंबईला धक्का
यंदाच्या मोसमात मुंबईच्या बॅट्समननी अनेकवेळा निराशा केली. मुंबईला मॅच जिंकवून देणारा हुकमी एक्का म्हणजे रोहित शर्मा. पण या वर्षी रोहितची कामगिरी निराशाजनक झाली आणि याचाच धक्का मुंबईला बसल्याचं दिसून येत आहे. आत्तापर्यंतच्या एकूण ११ आयपीएलमधली रोहितची ही सगळ्यात खराब कामगिरी आहे. यावर्षी १४ मॅचमध्ये रोहितनं २३.८३ ची सरासरी आणि १३३.०२च्या स्ट्राईक रेटनं २८६ रन केल्या. ११ आयपीएलमधल्या रोहितच्या या सगळ्यात कमी रन आहेत. यावर्षी रोहितनं दोन अर्धशतकं झळकावली, यामध्ये रोहितचा सर्वाधिक स्कोअर होता ९४ रन.
मागच्या वर्षीही रोहितकडून निराशा
रोहितचं एका आयपीएलच्या मोसमामध्ये सगळ्यात कमी रन बनवण्याचं याआधीचं रेकॉर्ड मागच्याच वर्षी झालं होतं. २०१७ साली रोहितनं १७ मॅचमध्ये २३.७८ ची सरासरी आणि १२१.९७ च्या स्ट्राईक रेटनं ३३३ रन केले होते. मागच्या वर्षीही रोहित फॉर्ममध्ये नसला तरी आयपीएल जिंकण्यात मुंबईला यश आलं होतं.
२०१३-२०१५ मध्ये चालली रोहितची बॅट
२०१७ प्रमाणेच २०१५ आणि २०१३ मध्येही रोहितच्या नेतृत्वात मुंबईनं आयपीएल जिंकली होती. या दोन्ही वर्षी रोहितची बॅट तळपली होती. २०१५ साली रोहितनं १६ मॅचमध्ये ३४.४२ च्या सरासरीनं आणि १४४.७४ च्या स्ट्राईक रेटनं रोहितनं ४८२ रन केल्या होत्या. आयपीएलच्या ११ मोसमातली सर्वोत्तम कामगिरी रोहितनं २०१३ साली केली होती. २०१३ मध्ये रोहितनं १९ मॅचमध्ये ३८.४२ ची सरासरी आणि १३१.५४ च्या स्ट्राईक रेटनं ५३८ रन केल्या होत्या.
११ वर्षातली रोहितची कामगिरी
आत्तापर्यंतच्या ११ आयपीएलमध्ये रोहितनं १७३ मॅचमध्ये ३१.८६ ची सरासरी आणि १३१.०२ च्या स्ट्राईक रेटनं ४,४९३ रन केल्या. रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये एक शतक आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईनं तीनवेळा आयपीएल जिंकण्यात यश मिळवलं.