`जर तुम्हाला संधी मिळालीये...`, रोहित शर्माचा के एल राहुलला अल्टिमेटम?, म्हणाला `मी काय सतत प्रत्येकाला...`
न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात सरफराज खानने (Sarfaraz Khan) शतक ठोकल्यानंतर के एल राहुलवरील (KL Rahul) दबाव वाढत चालला आहे.
न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि संघ व्यवस्थापनासमोर मोठी अडचण असणार आहे. पहिल्या सामन्यात सरफराज खानने (Sarfaraz Khan) शतक ठोकलं असून, दुसऱ्या सामन्यात शुभमन गिल (Shubman Gill) कमबॅक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुभमनसाठी रोहित शर्मा सरफराजला विश्रांती देणार की के एल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवणार याची उत्सुकता आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्माने राहुल, गिल आणि सरफराज यांचा समावेश असलेल्या स्थितीवर भाष्य केलं.
सरफराजने दुसऱ्या डावात 150 धावा ठोकल्या. तर दुसरीकडे के एल राहुल फलंदाजीत 0 आणि 12 धावा करत पूर्णपणे अयशस्वी ठरला. रोहित शर्माने आता संघातील प्रत्येकाला आपण करिअरच्या बाबतीत नेमके कुठे आहोत आणि काय करायला हवं याची माहिती असल्याचं म्हटलं आहे.
"हे पाहा, मी काही प्रत्येक सामन्यानंतर प्रत्येकाशी जाऊन बोलणाऱ्यातला नाही. ते त्यांच्या खेळात कुठे उभे आहेत, करिअरमध्ये कुठे उभे आहेत हे त्यांना माहीत आहे. आम्ही फक्त एका खेळावर, किंवा मालिकेच्या आधारे आमची मानसिकता बदलत नाही. त्यांना माहित आहे की ते कुठे उभे आहेत आणि संघाची परिस्थिती काय आहे हे त्यांना सुरुवातीपासून माहिती असतं. मी त्यांच्याशी जे बोलतोय त्यापेक्षा मी काही वेगळे बोलणार आहे असे मला वाटत नाही,” असं रोहितने पत्रकार परिषदेत सांगितलं.
"हे अगदी सोपे आहे, ज्याला संधी मिळते, त्याला खेळावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा एक साधा संदेश आहे ज्याच्याबद्दल आम्ही नेहमी बोलत असतो. अशा प्रकारचे खेळाडू खेळण्यासाठी वाट पाहत असतात हे नेहमीच छान असतं. शुभमनची संधी हुकली हे दुर्दैवी आहे, पण सरफराजला संधी मिळाली आणि त्याने मोठे शतक झळकावले हे संघासाठी चांगले चिन्ह आहे," असं कौतुक रोहित शर्माने केलं.
सामन्याबद्दल बोलायचं गेल्यास न्यूझीलंडने 28 षटकांत एकूण 107 धावांचं आव्हान पूर्ण केलं आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी चौथ्या आणि शेवटच्या डावात कोणतीही पडझड होणार नाही याची काळजी घेतली. परिणामी, न्यूझीलंडने 36 वर्षांनंतर भारतात पहिला कसोटी विजय नोंदवला. जॉन राइट यांच्या नेतृत्वाखाली 1988 मध्ये त्यांनी भारतात शेवटचा विजय मिळवला होता. न्यूझीलंडने भारतात फक्त तीन कसोटी जिंकल्या आहेत.
या पराभवाबद्दल बोलताना रोहित म्हणाला, "आम्हाला पुन्हा लढायचं होतं आणि शक्य तितके दिवस खेळात टिकून राहायचं होतं. विरोधी पक्षाला सहजपणे विजय मिळावा अशी आमची इच्छा नव्हीत. पहिल्या दिवसानंतर आम्हाला हवं तसं काही घडलं नाही. आम्ही 46 धावांवर बाद झालो. त्यांची स्थिती 190 धावांवर 3 गडी बाद होती. त्यांना पुढे जाऊ न देणं महत्वाचं होते, परंतु रचिन आणि टिम साउथी यांच्यातील भागीदारी आम्ही जे विचार करत होतो त्यापेक्षा थोडी पुढे गेली".
"बॅटसह दुसऱ्या डावात, एका टप्प्यावर आम्ही खेळात पुढे आहोत असं वाटलं. आम्ही 350 धावांनी मागे आहोत असे वाटलं नाही. या गोष्टीचा मला खरोखर अभिमान आहे. यावरून मानसिकता स्पष्ट आहे आणि खेळाडूंना मोकळेपणाने खेळायचं आहे. पहिले दोन तास वगळता आम्ही चांगलं कसोटी क्रिकेट खेळलो," असं रोहित पुढे म्हणाला.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत, रोहित शर्माने असंही सांगितलं की, पहिल्या डावात ते 46 धावांत गुंडाळले गेले तेव्हाचे "ते तीन तास" भारतीय संघ काय आहे याची व्याख्या ठरवू शकत नाहीत. "मी प्रामाणिकपणे या कसोटी सामन्याकडे जास्त लक्ष देणार नाही, कारण ते तीन तास हा संघ काय आहे हे ठरवणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे, कारण त्या तीन तासांबद्दल विचार करणे आणि खेळाडूंबद्दल मत तया करणं आणि वेगळं बोलणं योग्य ठरणार नाही,” असं रोहित म्हणाला.
“ग्रुपमध्ये सातत्यपूर्ण संदेश ठेवणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करत या सामन्यात पुनरागमन करण्याचा मार्ग आम्हाला खरोखरच सापडला. अर्थात, आम्ही एक कसोटी सामना गमावला. पण मला वाटते की या गेममध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या आहेत,” असंही तो पुढे म्हणाला.