सेंट मोरिट्स : स्वीत्झरलँडच्या सेंट मोरिट्समध्ये आईस क्रिकेटचा दुसरा सामना अपेक्षेनुसार रोमांचक राहिला. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धुतले. परंतु,  धडाकेबाज फलंदाजी करूनही त्यांचा संघ जिंकू शकला नाही. हा सामना पहिल्या सामन्याचा रिप्ले झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेहवागने धडाकेबाज फलंदाजी केली पण जॅक कॅलिसच्या शानदार  खेळीमुळे शाहीद आफ्रिदीच्या रॉयल्सने हा सामना आठ विकेटने जिंकला.  


स्वीत्झरलँडच्या बर्फाच्छादित भागात सेहवागच्या डायमंड्स XI आणि आफ्रीदीच्या रॉयल्स XI मध्ये दुसरा सामना खेळला गेला. यात  वीरेंद्र सेहवागने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यात सेहवागने २२ चेंडूत ४६ धावा कुटल्या. यात शोएब अख्तरला एक ओव्हरमध्ये ३ चौकार ठोकले. पण तो आपले अर्धशतक बनवू शकला नाही. त्यानंतर अँड्र्यू सायमंड आणि मोहम्मद कैळ यांनी तुफानी खेळी केली. सायमंडने ४२ चेंडूत ६७ तर कैफ याने ३० चेंडूत ५७ धावा काढल्या. त्यांनी २० ओव्हर्समध्ये २०५ धावा केल्या. 


याला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या रॉयल्सची टीमने लक्ष्य सहज पार केले. रॉयल्सने दोन गडी गमावून हा विजय मिळवला. ग्रॅम स्मिथ ३६ चेंडूत ५८ धावा केल्या. तर जॅक कॅलिस याने ३७ चेंडूत ९० धावांची धुवाँधार खेळी केली. यात डायमंड्सचा कोणताही गोलंदाज आपला प्रभाव टाकू शकला नाही.