मुंबई : वेस्ट इंडिज-ए विरुद्ध झालेल्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया-एचा ४-१ने दणदणीत विजय झाला. या दौऱ्यामध्ये दिमाखदार कामगिरी करत महाराष्ट्राच्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने टीम इंडियाचे दरवाजे ठोठावले आहेत. वेस्ट इंडिज दौराच नाही तर जून २०१९ साली झालेल्या श्रीलंका-ए विरुद्धच्या सीरिजमध्येही ऋतुराजने उत्कृष्ट कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सीरिजमध्ये ऋतुराजने २०७ रन केले. या सीरिजमध्ये सर्वाधिक रन करणारा ऋतुराज हा दुसरा खेळाडू आहे. शुभमन गिलने या सीरिजमध्ये सर्वाधिक २१८ रन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२२ वर्षांच्या ऋतुराज गायकवाडने ओपनिंगला खेळत मागच्या ८ मॅचमध्ये ११२.८३ च्या सरासरी आणि ११६.७२ च्या स्ट्राईक रेटने ६७७ रन केल्या. यामध्ये २ शतकं आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. वेस्ट इंडिज ए विरुद्धच्या शेवटच्या वनडेमध्ये ऋतुराज ८९ बॉलमध्ये ९९ रन करून आऊट झाला. त्याआधी या सीरिजमध्ये ऋतुराजने ३, ८५ आणि २० रनची खेळी केली होती.


श्रीलंका-ए विरुद्ध ऋतुराजने ५ मॅचच्या ४ इनिंगमध्ये ४७० रन केले. यामध्ये नाबाद १८४ रन, नाबाद १२५ रन, ८४ रन आणि ७४ रनची खेळी केली. श्रीलंकेविरुद्धच्या ४ मॅचच्या सीरिजमध्ये ऋतुराज फक्त २ वेळा आऊट झाला.


लिस्ट ए (मर्यादित ओव्हर) कारकिर्दीमध्ये ऋतुराज गायकवाडने ३९ मॅचमध्ये ५७.०८ च्या सरासरीने आणि १०१.५३ च्या स्ट्राईक रेटने २,०५५ रन केले. यामध्ये ५ शतकं आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.


२०१६-१७ च्या विजय हजारे स्पर्धेमधून ऋतुराज गायकवाड पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. त्या मोसमात ऋतुराजने ७ मॅचमध्ये ४४४ रन केले. २०१६-१७च्या विजय हजारे स्पर्धेत ऋतुराज सर्वाधिक रन करणारा तिसरा खेळाडू होता. पण त्यानंतरच्या दोन मोसमात ऋतुराजला चमकदार कामगिरी करता आली नाही. 'मला ३० रनना ५० रनमध्ये आणि ७० रनना १०० रनमध्ये रुपांतरित करता येत नव्हतं,' अशी खंत ऋतुराजने व्यक्त केली.


इमर्जिंग टीम आशिया कप आणि इंग्लंड लायन्सविरुद्ध ऋतुराजने ठीकठाक कामगिरी केली. पण आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळल्यामुळे मदत झाल्याचं ऋतुराजने सांगितलं. चेन्नई टीममध्ये प्रवेश मिळणं ही कठीण गोष्ट समजली जाते. चेन्नईकडून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नसली तरी खूप गोष्टी शिकायला मिळाल्याचं ऋतुराज म्हणाला.


'चेन्नईच्या टीममध्ये सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहेत. चेन्नईच्या टीममध्ये सरावही मॅचसारखाच होतो. माईक हसीबरोबर मी मानसिक दृष्टीकोनावर काम केलं,' अशी प्रतिक्रिया ऋतुराजने दिली.


'टी-२० क्रिकेट म्हणजे फक्त मोठे शॉट्स मारणं नाही. तर १३० ते १४० दरम्यान तुमचा स्ट्राईक रेट ठेवणं आहे. हे तुम्ही कसं करता, त्यावर बऱ्य़ाच गोष्टी अवलंबून आहेत. जर तुम्ही एक सिक्स मारून पुढच्या ४ बॉलला एकही रन काढली नाही, तर त्याचा काहीच फायदा नाही. त्यापेक्षा तुम्ही बाऊंड्री मारून दोन रन काढा. याचा मला मोठी इनिंग खेळण्यासाठी फायदा झाला,' असं वक्तव्य ऋतुराजने केलं.


'क्रिकेटमध्ये माझा कोणीही आयडल नसला तरी विराट कोहली मला प्रेरणा देतो. मागच्या इनिंगमध्ये शतक केल्यानंतरही विराट पुढच्या मॅचमध्ये त्याच निश्चयाने येतो. मला त्याच्यासारखाच सातत्यपूर्ण खेळ करायचा आहे. प्रत्येक मॅचमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची भूक मला आहे. याशिवाय माझं काहीच उद्दीष्ट नाही,' असं ऋतुराज म्हणाला.