दारुण पराभवानंतर भारतीय संघावर ICC ची मोठी कारवाई; Test Championship चं स्वप्न भंगलं?
SA Beat IND ICC Penalised Team India: भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकन संघाने सेंच्युरिअनच्या मैदानावर दारुण पराभव केल्यानंतर आयसीसीनेही भारताविरुद्ध कठोर कारवाई केली आहे.
SA Beat IND ICC Penalised Team India: दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरिअनच्या मैदानावर झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाचा दारुण पराभव झाला आहे. कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी भारतीय संघ 1 डाव आणि 32 धावांनी पराभूत झाला. भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावामध्ये नांगी टाकल्याने भारताला दक्षिण आफ्रिकेने मिळवलेल्या आघाडीपर्यंतही पोहचता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर झालेला भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. भारताला पराभवाचा धक्का बसलेला असतानाच आयसीसीनेही भारतीय संघाविरोधात कठोर कारवाई केली आहे. भारतीय संघाची 10 टक्के मॅच फी कापली जाणार आहे. तसेच भारतीय संघाला आयसीसीच्या वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये 2 पॉइण्ट्सचा फटका बसणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये भारताने षटकांच्या गतीमध्ये सातत्य राखलं नाही म्हणून स्लो ओव्हर रेटसाठी भारताला दंड ठोठावण्यात आला आहे.
कोणी घेतला हा निर्णय?
ख्रिस बोर्ड ऑफ एमिरिट्स आयसीसी एलिट पॅनमधील पंचांच्या गटाने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. भारताला नियोजित वेळेमध्ये जितकी षटकं टाकणं आवश्यक होतं त्यापेक्षा भारतीय संघ 2 ओव्हर मागे होता. याच 2 ओव्हरने मागे राहण्याचा फटका भारतीय संघाला बसला आहे. भारतीय संघाने या सामन्यामध्ये एकदाच गोलंदाजी करुनही त्यांना षटकं फेकण्याची सरासरी राखता आली नाही हे विशेष.
नेमकी काय कारवाई झाली?
आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्ट फॉर प्लेअर्स सपोर्ट पर्सनलच्या 2.22 अनुच्छेदानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या नियाअंतर्गत स्लो ओव्हर रेटसाठी कारवाई केली जाते. याच नियमानुसार भारतीय संघातील खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनामधून प्रत्येक षटकासाठी 5 टक्के या हिशोबाने 2 ओव्हर मागे राहिल्याने 10 टक्के मानधन कापलं आहे. त्याचप्रमाणे अनुच्छेद 16.11.2 मध्ये आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशीपमधील अटी-शर्थींबद्दल नमूद करण्यात आलं असून स्लो ओव्हर रेटच्या नियमाप्रमाणे प्रत्येक लेट ओव्हरसाठी एक पॉइण्ट कापला जाणार आहे. त्यामुळे संघ म्हणून भारताला 2 पॉइण्ट्सचा फटका बसला आहे.
भारताची अवस्था बिकट
आयसीसीने 2 गुण कापल्याचा मोठा फटका भारताला बसला आहे. भारतीय संघ आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशीपमधील पॉइण्ट्स टेबलमध्ये या पराभवामुळे सहाव्या स्थानी घसरला आहे. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया हे संघ पाहिल्या पाचमध्ये आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये अव्वल 2 संघच अंतिम सामना खेळतात. आतापर्यंतच्या दोन्ही चॅम्पियनशीपमध्ये भारतीय संघ खेळला असला तरी त्यांना जेतेपद पटकावता आलेलं नाही. पहिल्यांदा न्यूझीलंडकडून आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत झाला. आता पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारत खेळतो की नाही हाच प्रश्न सध्याचं पॉइण्ट्स टेबल पाहून पडतोय.
रोहितने मान्य केली चूक
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने या चुका झाल्याचं मान्य केलं आहे. त्याने ही शिक्षा स्वीकारली आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात भारतीय संघ कोणताही अपील अर्ज करणार नाही. मैदानावरील पंच पॉल रिफील आणि लँगटन रुसेरी तसेच तिसरे पंच अशान राझा आणि चौथे पंच स्टीफन हॅरीस यांनी या कारवाईला अनुमोदन दिलं आहे.