चौथ्या वनडे आधी जर्सीने भारतीय टीमचं टेन्शन वाढवलं
विजयाचा सिलसिला कायम ठेवत भारतीय टीम आज दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात चौथ्या वनडेत विजय मिळवत पुन्हा एकदा इतिहास घडवण्याचा प्रयत्न करेल.
जोहान्सबर्ग : विजयाचा सिलसिला कायम ठेवत भारतीय टीम आज दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात चौथ्या वनडेत विजय मिळवत पुन्हा एकदा इतिहास घडवण्याचा प्रयत्न करेल.
वेगळ्या जर्सीमध्ये मैदानात
जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ आज हिरव्या-पिवळ्या जर्सीमध्ये नाही तर गुलाबी रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. या जर्सीमध्ये दक्षिण आफ्रिकेने एकही सामन्यात पराभव स्विकारला नाही. जेव्हा जेव्हा दक्षिण आफ्रिका टीम या गुलाबी जर्सीमध्ये उतरली तेव्हा तेव्हा त्यांनी प्रत्येक सामना जिंकला आहे.
प्रत्येक सामन्यात विजय
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड, खेळाडू आणि एनजीओ मिळून महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रति जागरुकता आणण्यासाठी फंड गोळा करण्यासाठी मागील अनेक वर्षापासून हे काम करत आहेत. पहिल्यांदा याचं आयोजन 2011 मध्ये झालं होतं. सहाव्यांदा दक्षिण आफ्रिका या जर्सीमध्ये खेळत आहे. त्यामुळे चौथ्या विजयाच्या प्रयत्नात असलेल्या टीम इंडियापुढे आज हे आव्हान असणार आहे.
सिरीज जिंकण्याची संधी
सीरीजमध्ये 3-0 ने पुढे असलेली भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवर पहिली वनडे सीरीज जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. याआधी 2010-11 मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात 2-1 ने पुढे असतांना देखील नंतर भारताचा 3-2 ने पराभव झाला होता.