मुंबई : सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण. भारताच्या या तीन दिग्गज क्रिकेटपटूंची बीसीसीआयनं क्रिकेट सल्लागार समिती बनवली. पण लाभाच्या पदांच्या मुद्द्यामुळे या तिघांना क्रिकेट सल्लागार समितीचं पद भुषवता येणार नाही, अशी माहिती इंडियन एक्सप्रेसला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. सौरव गांगुली हा सध्या पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि क्रिकेट समिक्षक आहे. तर लक्ष्मण हादेखील क्रिकेट समिक्षक आणि आयपीएलमध्ये हैदराबादच्या टीमचा सल्लागार आहे. तर सचिन तेंडुलकरचा मुलगा अंडर १९ टीमचा सदस्य आहे. नियमांनुसार प्रशिक्षक किंवा निवड समिती सदस्याचा नातेवाईक टीम निवडीमध्ये दावेदार असेल तर त्याला पद सोडवं लागतं, त्यामुळे या तिघांच्या क्रिकेट सल्लागार समितीवर गदा येण्याची शक्यता आहे. २०१५ साली नरेंद्र हिरवाणी मध्य प्रदेशच्या निवड समितीचे सदस्य होते पण त्यांचा मुलगा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असल्यामुळे हिरवाणींना पद सोडावं लागलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यांना आता मानधन देण्यात येणार आहे. सध्याची क्रिकेट सल्लागार समिती कोणतंही मानधन घेत नाही. मागच्या वर्षी मात्र समितीनं मानधन मागितल्याचा चर्चा होत्या पण बीसीसीआयनं या चर्चा फेटाळून लावल्या आणि या तिघांनी कोणतंही मानधन मागितलं नसल्याचं स्पष्ट केलं.


भारतीय टीमच्या प्रशिक्षक निवडीचे अधिकार क्रिकेट सल्लागार समितीला आहेत. २०१६ साली या तिघांच्या समितीनं अनिल कुंबळेची आणि २०१७ साली रवी शास्त्रीची प्रशिक्षक म्हणून निवड केली होती. भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षक निवडीमध्ये मात्र या तिघांनी कोणतीच भूमिका बजावली नव्हती.