Sachin Tendulkar Meet Vinod Kambli: द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांनी क्रिकेटर्सची मोठी पिढी घडवली. त्यामुळे देशासह जगभरात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. 3 डिसेंबरला आचरेकर सरांच्या जयंतीनिमित्त दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क येथे त्यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभारण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासह रमाकांत आचरेकर यांचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी एका कोपऱ्यात बसलेल्या विनोद कांबळीला पाहून सचिन तेंडुलकर त्याला भेटायला गेला. पुढे जे घडलं त्याने सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. 


काय म्हणाले राज ठाकरे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुपोर्णिमेला दरवर्षी आचरेकर सरांच्या पाया पडायला यायचे. पण आजकालची गुरुपोर्णिमा हॅप्पी गुरुपोर्णिमा मेसेजवर थांबते. गुरु नावाची गोष्ट जपणे हे महत्वाचे असते, असे राज ठाकरे म्हणाले. सुनील रमणी यांच्याशी मी बोललो. इथे आचरेकर सरांचे स्मारक असावे असे मला वाटत होते. इथे मला पुतळा नको होता. इथे स्टम्प, बॅट, सर्व आहे. यावर आचरेकर सरांची कॅप आहे. कॅप त्यांची ओळख होती,  आज क्रिकेट बदललंय. साऱ्या गोष्टी बदलल्यात. पण त्यांनी खेळाडूंवर केलेले संस्कार त्यांच्या समोर बसलेल्या खेळाडुंमध्ये दिसतात. आजही विद्यार्थी सांगतात आम्हाला तेंडुलकर, कांबळीसारखं खेळता येत नाही. आचरेकर सर जिनियस होते, असे राज ठाकरे म्हणाले. शिक्षक नावाची गोष्ट राहिली नाही. दहावी, बारावीची मुलं येतात. काय करणार पुढे? असं मी विचारल्यावर मी डॉक्टर, इंजिनीअर होणार असे सांगतात. पण एकही विद्यार्थी मला शिक्षक व्हायचंय असं सांगतात. ज्या देशात विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचं नाही त्या देशाचं काय होणार? असे प्रश्नवजा चिंता राज ठाकरेंनी व्यक्त केली. 



सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या भावना 


आचरेकर सरांच्या ग्राऊंडवर नेहमी प्राक्टिस मॅच नेहमी असायची. त्यांच्या मार्गदर्शनासाठी क्रिकेट नेहमी चालू असायचं. सरांनी मला नेहमी पाहिजे ती मदत केल्याच्या भावना सचिन तेंडुलकर याने व्यक्त केल्या. आचरेकर सरांनी आम्हाला किटदेखील दिली. आम्हाला प्रत्येक गोष्टीची किंमत करायला शिकवली. सरांनी आम्हाला स्मार्ट प्लेयर म्हणून तयार केलं. नकळत त्यांनी खूप काही गोष्टी शिकवल्याचे त्याने सांगितले. क्रिकेट किटवर तुम्ही राग काढू नका, त्याची रिस्पेक्ट करा, असं त्यांनी आम्हाला नेहमी सांगितल्याचे सचिन म्हणाला. सरांनी माझं वेल प्लेड म्हणून कौतूक केलं नाही. पण त्यांची कौतूक करण्याची पद्धत वेगळी होती, अशी आठवण देखील सचिनने सांगितली.


विनोद कांबळीने म्हटलं गाणं 


रमाकांत आचरेकर सरांच्य आठवणीबद्दल विनोद कांबळीला बोलण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी थरथरच्या हाताने विनोद कांबळीने माईक हातात घेताल. पण त्याला स्पष्टपणे बोलता येत नव्हते. त्याची ही अवस्था पाहून साऱ्यांनाच वाईट वाटत होते. 'मला नक्कीच आचरेकर सरांची आठवण येते. मी आता काय बोलू.. मला फक्त एक गाणं म्हणायचंय. आचरेकर सरांना कोणतं गाणं आवडायचं तुम्हाला माहिती आहे का? असा प्रश्न त्याने उपस्थित मुलांना विचारला. यानंतर मी शॉर्टकटमध्ये सरांचं आवडतं गाणं म्हणतो, असं म्हणत विनोद कांबळीने ‘सरजो मेरा टकराय…’, गाणं म्हटलं. लव यु सर म्हणत कांबळीने भाषण संपवलं.


तेंडुलकर-कांबळी भेटीत काय घडलं? 



कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंचाच्या उजव्या कोपऱ्यात विनोद कांबळी बसला होता. सचिनने विनोद कांबळीला पाहिले. तसेच तो त्याला भेटायला गेला. सचिनला पाहून विनोद कांबळीच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. त्याने सचिनचे मनगट जोरात धरले आणि आपल्या मित्राला तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताना दिसला. पण त्याला आपल्या भावना शब्दात मांडता येत नव्हत्या. आचरेकर सरांच्या 2 शिष्यांची भेट, 2 मित्रांच्या भेटीचा हा क्षण साऱ्यांनी पाहिला. मंचाच्या मध्यभागी उभे असलेले राज ठाकरेदेखील दोघांच्या भेटीचा क्षण पाहतच राहिले.