मुंबई : ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांवर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही आपल्या गुरुंचं अंत्यदर्शन घेतलं. शिवाजी पार्कवर आचरेकर सरांच्या अंत्यसंस्कारासाठी सचिन तेंडुलकर उपस्थित आहे. आपल्या सरांच्या जाण्यानं सचिनला अश्रू अनावर झाले. शालेय जीवनात असताना सचिनला आचरेकर सरांनीच क्रिकेटचे धडे दिले होते. सचिनला घडवण्यात आचरेकर सरांचा खूप मोठा वाटा आहे. सचिनेही वेळोवेळी आपल्या गुरुंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली होती. आचरेकर सर यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी सचिन भावूक झाला. त्याला अश्रू अनावर झाले. सचिनसह विनोद कांबळी, चंदू पडीत, रमेश पोवार, अजित आगरकर या क्रिकेटपटूंना आचरेकर सरांनी मार्गदर्शन केलं होते. क्रिकेटचे धडे दिले होते.


आचरेकरांना बॅटनं मानवंदना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाजी पार्कवर आचरेकर सरांचा पार्थिव नेण्यात आलं आणि यावेळी आचरेकर सरांना क्रिकेट बॅटने मानवंदना देण्यात आली. 


अनेक मान्यवरांनी आचरेकर सरांना श्रद्धांजली वाहिली. बुधवारी संध्याकाळी मुंबईतल्या दादरमधल्या राहत्या घरी आचरेकर सरांनी अखेरचा श्वास घेतला. १९३२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये त्यांचा जन्म झाला होता. अनेक क्रिकेटपटूंना घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर यांच्याकरता, मुंबईतलं शिवाजी पार्क मैदान ही जणू कर्मभूमीच होती. त्यांनी शिवाजी पार्कवर कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली होती. १९९० मध्ये क्रीडा क्षेत्रातला मानाचा द्रोणाचार्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर २०१० मध्ये पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं.


टीम इंडियाची मानवंदना


दुसरीकडे, अनेक नामवंत क्रिकेटपटू घडवणारे ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर यांना सिडनी कसोटीत टीम इंडियाने श्रद्धांजली वाहिली. सिडनी कसोटीत दंडाला काळ्या फिती बांधून टीम इंडिया मैदानात उतरली.