स्मिथ-वॉर्नरच्या बंदीवर बोलला क्रिकेटचा देव!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. तर कॅमरून बँक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे.
क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ असल्याचं बोललं जातं. हा खेळ स्वच्छ पद्धतीनं खेळला पाहिजे, असं मला वाटतं. जे काही झालं ते दुर्दैवी आहे आणि खेळ पवित्र राहण्यासाठी घेतलेला हा निर्णय योग्य आहे. जिंकणं हे महत्त्वाचं आहे पण तुम्ही कोणत्या मार्गानं जिंकता हे जास्त महत्त्वाचं आहे, असं ट्विट सचिननं केलं आहे.
झालेल्या प्रकाराबद्दल खेळाडूंनी दिलगिरी व्यक्त केली आहे तसंच त्यांना याबाबत दु:खही झालं आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांना शिक्षाही झाली आहे. खेळाडूंच्या कुटुंबानाही यामुळे सहन करावं लागत आहे. त्यामुळे एक पाऊल मागे जाऊन या खेळाडूंना आणि त्यांच्या कुटुंबाला वेगळं सोडण्याची मागणी सचिननं केली आहे.