मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचे जगभरात लाखो चाहते आहेत. अनेकांना सचिनला भेटण्याची इच्छा असते. पण काहींनाच भेटीची संधी मिळते. असाच एक नशीबवान चाहता म्हणजे राजूदास राठोड. काही दिवसांपूर्वी राजूदास राठोड हे  'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमात त्यांनी सचिनबद्दल जी माहिती दिली त्यामुळे खुद्द सचिन भारावून गेला आणि त्याने थेट आपल्या त्या चाहत्याला भेटीचे आश्वासन दिले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमादरम्यान अमिताभ बच्चन राजूदास यांना सचिन विषयी माहिती सांगत होते. त्यावेळेस राजूदास यांनी सुद्धा सचिनविषयीचे त्यांचे मत मांडले. ते म्हणाले, "१९९६ नंतर मला क्रिकेट खऱ्या अर्थाने कळायला लागले. तेव्हा पासून मी सचिनने खेळलेले सगळे सामने पाहिले आहेत. जेव्हा तो शतक पूर्ण करायचा तेव्हा २-३ दिवस मी आंनदाने वेडापिसा व्हायचो. पण जेव्हा सचिन ९९ धावा करुन बाद व्हायचा तेव्हा मात्र माझा हिरमोड व्हायचा. सचिन जेव्हा खेळण्यासाठी मैदानात उतरायचा तेव्हा मी १ तास आधीच टिव्ही समोर बसून राहायचो. सचिनने मला खूप आंनदही दिला आणि दुखः सुद्धा दिले आहे. एकदा तर वेगळेच घडले. माझ्या मुलीला एकदा कार्टून बघायचे होते आणि मला क्रिकेट. पण ती तिच्या हट्टावर अडून बसली. तेव्हा मी नाइलाजास्तव टीव्हीचा रिमोट तोडला होता. कारण मला सचिन खूप आवडतो. मला त्याला एकदा भेटायचे आहे."


 



सचिनला जेव्हा या चाहत्याबद्दल कळले तेव्हा त्याने 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला. 'तुम्ही खूप छान खेळलात राजूदास, तुमची गोष्ट ऐकून खूप मजा आली. मी आशा करतो की तुम्ही आणखी रिमोट तो़डणार नाही. आपण लवकरच भेटू' असे कॅप्शन सचिनने या पोस्टला  दिले आहे.