Corona : क्रिकेटचा देव सांगतोय, आता तरी ऐका!
भारतामध्ये कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे.
मुंबई : भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेही जनतेला या २१ दिवसात घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. सचिनने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
सध्याची परिस्थिती सुट्ट्या असल्यासारखी नाही, जिकडे लोकं रस्त्यावर फिरू शकतील आणि एकमेकांना भेटू शकतील, असं सचिन त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.
'नमस्कार, आपल्या सरकारने २१ दिवस घरात राहण्याची विनंती केली आहे. तरीही अनेक जण याचं पालन करत नाहीत. या कठीण समयी घरात राहणं आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं आणि कोरोनाचा खात्मा करणं हे आपलं कर्तव्य आहे. बाहेर गेलं पाहिजे आणि मित्रांची भेट घेतली पाहिजे, असं प्रत्येकालाच वाटत आहे. पण ही योग्य वेळ नाही. सध्या हे देशासाठी हानीकारक आहे. हे दिवस सुट्ट्यांचे नाहीत, हे लक्षात ठेवा,' अशी प्रतिक्रिया सचिनने दिली आहे.
'आपण सगळ्यांनी घरात राहा. डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयात काम करणारे कर्मचारी आपल्यासाठी लढत आहेत. त्यांच्यासाठी आपण एवढं तर करुच शकतो. मी आणि माझं कुटुंब मागचे १० दिवस मित्रांना भेटलो नाही आणि पुढच्या २१ दिवसांसाठीही आम्ही हेच करणार आहोत. आपण स्वत:ला आणि आपल्या परिवाराला फक्त घरामध्ये राहूनच वाचवू शकतो आणि कोरोनाचा प्रसार थांबवायला मदत करु शकतो,' असं आवाहन सचिनने केलं आहे.