Sachin Tendulkar Viral Video On Virat Kohli Off Side Issue: भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू विराट कोहलीने पुन्हा एकदा ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू खेळताना विकेट गमावली. तिसऱ्या कसोटीमध्ये रविवारी विराट कोहली 16 बॉलमध्ये 3 धावा करुन बाद झाला. बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेमध्ये तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात विराटची भांबेरी उडाल्याचं पाहायला मिळालं. खरं तर विराटने मागील तीन डावांमध्ये अशाच प्रकारे आपली विकेट गमावली आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही विराटची ही कमतरता ठाऊक झाली असून ते सुद्धा मुद्दाम विराटला अशाच पद्धतीचे चेंडू टाकतात की ज्यामुळे चेंडू बॅटची कट घेऊन थेट विकेटकीपर किंवा स्लीपमधील खेळाडूच्या हातात विसावतो. मात्र विराटच्या या समस्येवर काय उपाय आहे अशी चर्चा सुरु असतानाच आता विराटचा आदर्श असलेल्या सचिन तेंडुलकरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ विराटच्या समस्येवरील रामबाण उपाय असल्याचा दावा चाहत्यांनी केला आहे.


सचिनबरोबर नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांनी विराट कोहलीने आता त्याचा आदर्श असलेल्या सचिनकडून प्रेरणा घेतली पाहिजे. 2003 च्या शेवटच्या महिन्यामध्ये सचिन तेंडुलकरबरोबरही असाच काहीसा प्रकार घडत होता. त्यावेळी सचिन सलग 13 डावांमध्ये शतक न झळकावता बाद होत होता. 2003 ते 2024 च्या बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियामध्ये सचिन तेंडुलकरसाठी त्याचा आवडता कव्हर ड्राइव्हच त्याचा सर्वात मोठा शत्रू ठरत होता. कव्हर ड्राइव्ह मारताना सचिनने अनेकदा विकेट टाकली होती. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये असं चित्र दिसून आल्यानंतर चौथ्या सामन्यात सचिनच्या फलंदाजीने कात टाकली. सिडनीमधील कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या डावात सचिनने 436 बॉलमध्ये 241 धावा केल्या. यामध्ये त्याने 33 चौकार लगावले. मात्र यापैकी एकही चौकार कव्हरला मारला नव्हता.


सचिनने नेमकं काय ठरवलं?


मात्र सचिनने असं केलं काय? याच खेळीबद्दल बोलताना सचिनने, "तुम्ही कोणता फटका मारताना बाद होता यावर लक्ष ठेवलं पाहिजे. कव्हर ड्राइव्ह खेळायचाच नाही असं काही ठरवलं नव्हतं. मात्र मी मैदानात उतरल्यानंतर मला जाणवलं की ऑस्ट्रेलियन खेळाडू माझ्या संयमाचा अंत पाहत होते. मला मुद्दाम सगळे चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकले जात होते. त्यामुळे मी विचार केला की, "तुम्हाला माझ्या संयमाची परीक्षा पाहायची आहे का? चला तर मग आता मी विरुद्ध तुम्ही 11 असं होऊन जाऊ दे. कोणाचा संयम पहिला ढळतो ते पाहूयात", या विचाराने मी खेळू लागलो," असं सांगितलं होतं. 


अखेर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी नाद सोडला


सचिनने ऑफ स्टम्पबाहेरचा चेंडून खेळायचाच नाही असं ठरवल्यानंतर बराच वेळ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्याला तिथेच गोलंदाजी केली. मात्र सचिन प्रतिसादच देत नसल्याने गोलंदाज सरळ चेंडू टाकू लागले आणि सचिनने त्यांचा चांगलाच समाचार घेतला. सचिन तब्बल 436 बॉल खेळला. सचिनच्या खेळीमुळे हा सामना आणि मालिका अनिर्णित राहिली.



आता विराटलाही सचिनप्रमाणेच असा दृढ निश्चय करुन मैदानात उतरावं लागणार आहे.